कल्याणमधील बारावे कचरा प्रकल्पास लागली आग, अग्नीशमन दलाकडून नियंत्रण मिळविण्यात यश
By मुरलीधर भवार | Published: April 11, 2024 07:03 PM2024-04-11T19:03:29+5:302024-04-11T19:04:17+5:30
बारावे येथे महापालिकेचा घनकचरा प्रकल्प आहे. या ठिकणी कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते.
कल्याण-शहराच्या पश्चिम भागातील बारावे येथील घनकचरा प्रकल्पातील कचऱ्याला आज दुपारी अचानक आग लागल्याची घटना आज दुपारी २ वाजता घडली. ही माहिती मिळताच अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. आग विझविण्याचे काम सुरु केले. तीन तासात अग्नीशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. आग विझविण्याकरीता पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.
बारावे येथे महापालिकेचा घनकचरा प्रकल्प आहे. या ठिकणी कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. या ठिकाणी साठवणूक केलेल्या कचऱ्याला आज दुपारी आग लागली. आगीमुळे धुराचे लोट सगळीकडे पसरले. प्रकल्पाच्या नजीकच्या रहिवासी साेसायट्यांमध्ये नागरीकांच्या नाका तोंडात धूर गेल्याने नागरीकांचा जीव कासावीस झाला. भर दुपारी ही घटना घडल्याने आधीच उन्हाचा तडाखा त्यात धूराचा त्रास अशा दुहेरी त्रासाला नागरीकांना तोंड द्यावे लागले.
अग्नीशमन दलाचे मुख्य अधिकारी नामदेव चौधरी यांनी सांगितले की, या प्रकल्पातील कचऱ्याला दहा दिवसापूर्वी आग लागल्याची घटना घडली होती. त्या आगीची धग कुठे शिल्लक असल्यास त्यामुळे आग लागली असावी अशी शक्यता आहे. तसेच उन्हाळ्यात तापमानाचा पारा वाढल्यावर कचऱ्याच्या ढिगाखाली मिथून वायू तयार होऊन कचरा आपोआप पेट घेतो. त्यामुळेही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
बारावे गोदरेज हिल सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुनिल घेगडे यांनी सांगितले की, बाारवे प्रकल्पात कचरा प्रक्रिया करण्याऐवजी त्याठिकाणी कचरा साठविला जातो. त्याठिकाणी कचऱ्याचे वर्गीकरण केले जात नाही. त्यामुळे हा प्रकल्प नागरीकांकरीता शाप ठरत आहे. दहा दिवसापूर्वी या प्रकल्पास आग लागली होती. ती शांत होत नाही. तोच आज पुन्हा आग लागली. मागच्या वर्षी भर उन्हाळ्यात अशा प्रकारची मोठी आग प्रकल्पातील कचऱ्याला लागली होती. आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहे. त्याबाबत महापालिका प्रशासन गांभीर्याने घेत नाही. कल्याण पूर्वे, डोंबिवली पूर्व पश्चिम आणि टिटवाळा आंबिवलीसह २७ गावातील कचरा प्प्रकल्पात आणून टाकला जात आहे. वास्तविक पाहता ज्या ठिकाणी कचरा निर्माण होतो. त्याच ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट लावली पाहिजे असा नियम आहे.
हा नियम धाब्यावर बसविला जातो. तसेच महापालिका आेल्या कचऱ्यावरील प्रक्रियेकरीता १३ ठिकाणी बायोगॅस प्रकल्प राबविणार होती. त्यापैकी कैवळ चार ठिकाणी बायोगॅस प्रकल्प सुरु करण्यात आलेले आहे. उर्वरीत प्रकल्प कधी राबविणार आहे असा सवाल घेगडे यांनी उपस्थित केला आहे. या शिवाय वेस्ट टू एनर्जी -कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प राबविण्याच्या बाता केवळ महापालिका प्रशासनाकडून झोडल्या जात आहे. तो प्रकल्प ही कधी अस्तित्वात येणार याचे उत्तर महापालिका प्रशासनाकडे नाही.