कल्याणमध्ये अग्नितांडव! अग्निशमन दलाची ५५ मीटर उंच शिडी बंद, २ तास धुमसत होती आग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 05:42 AM2024-11-27T05:42:38+5:302024-11-27T05:42:46+5:30
उंच इमारतीची आग विझविण्यासाठी लागणारी ५५ मीटर उंच शिडी बंद असल्याने ठाण्याहून उंच शिडी मागवली. ती येण्यास उशीर झाल्याने आग विझविण्यासाठी तब्बल दोन तास लागले.
कल्याण - आधारवाडी परिसरातील वर्टेक्स सॉलिटीअर इमारतीच्या १५ व्या मजल्यावर मंगळवारी सायंकाळी पावणेसहा वाजता भीषण आग लागली. आगीने थोड्याच वेळात रौद्र रूप धारण केले. पाहता पाहता ही आग १४, १६ आणि १७ व्या मजल्यावर पसरली. त्यामुळे या मजल्यावरील कोट्यवधी रुपये किमतीची घरे आगीत जळून भस्मसात झाल्याने रहिवाशांचे नुकसान झाले.
आग लागल्याचे कळताच रहिवासी जीव मुठीत धरून इमारतीबाहेर पडल्याने जीवितहानी झाली नाही. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या तत्काळ दाखल झाल्या. मात्र, कल्याणमधील अग्निशमन यंत्रणा किती तोकडी आहे याचे पितळ उघडे पडले. उंच इमारतीची आग विझविण्यासाठी लागणारी ५५ मीटर उंच शिडी बंद असल्याने ठाण्याहून उंच शिडी मागवली. ती येण्यास उशीर झाल्याने आग विझविण्यासाठी तब्बल दोन तास लागले. या तोकड्या यंत्रणेबद्दल रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला.
आधारवाडी परिसरात वर्टेक्स सॉलिटीअर ही उच्चभ्रू इमारत आहे. या १७ मजली इमारतीच्या १५ व्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये सायंकाळी आग लागली. घरात एक तरुण झाेपला होता. आग लागल्याचे कळताच तो जीव मुठीत धरून इमारतीच्या खाली पळाला. आगीने थोड्याच वेळात रौद्र रूप धारण केले. आगीची माहिती मिळताच रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या, पाण्याचे टँकर आणि पोलिस इमारतीच्या ठिकाणी दाखल झाले. अनेक रहिवासी त्यांच्या घरातील सदस्य सुखरूप आहे की नाही याची खात्री करू लागले. महिला वर्गाला तर रडूच काेसळले. आग इतरत्र पसरू नये यासाठी इमारतीचा वीज पुरवठा खंडित केला. उंच शिडी नसल्याने अग्निशमन दलाच्या जवानांकडून मारण्यात येणारा पाण्याचा फवारा आगीच्या ज्वाळांपर्यंत पोहोचत नव्हता. घटनास्थळी अपर पोलिस आयुक्त संजय जाधव दाखल झाले.
आयुक्तांनी दिली कबुली
घटनेची माहिती मिळताच आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी इमारतीच्या ठिकाणी धाव घेतली. आग विझवण्यासाठी लागणारी ५० मीटर उंचीची शिडी बंद असल्याचे जाखड यांनी मान्य केले. ही शिडी ठाण्यातून मागविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
नागरिकांचा आरोप
इमारतीमधील रहिवासी शंकर सोनी म्हणाले की, आग विझवण्याकरिता इमारतीत फायर यंत्रणा आहे. मात्र, महापालिकेची यंत्रणा तोकडी आहे. वेळीच प्रयत्न केले असते तर आग पसरली नसती. नुकसान झाले नसते.
ड्रोनने आढावा
आग नियंत्रणात येत नसल्याने पालिकेने कोणत्या मजल्यावर आग किती पसरली आहे, याची माहिती घेण्याकरिता ड्रोन कॅमेरे सोडले होते. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.
१४ मजल्यावर शहर अभियंत्याचे घर जळून खाक
इमारतीच्या १४ व्या मजल्यावर केडीएमसीच्या शहर अभियंत्या अनिता परदेशी राहतात. आग लागताच त्या खाली आल्या. मात्र, त्यांचे पती वरच होते. त्यांच्याशी अनिता यांनी संपर्क साधला असता त्यांचे पती सुखरूप होते. मात्र, परदेशी यांचे घर जळून खाक झाले. घराची चिंता न करता त्यांनी आग विझवण्याच्या कामावर देखरेख करण्यावर लक्ष दिले.