कामावरून काढले; बदला घेण्यासाठी दुकानातच केली चोरी
By प्रशांत माने | Published: June 30, 2023 04:40 PM2023-06-30T16:40:47+5:302023-06-30T16:41:34+5:30
कर्जबाजारी नोकराचे कृत्य.
प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: कामावरून काढल्याने त्याचा बदला घेण्यासाठी नोकराने त्याच दुकानात चोरी केल्याची घटना समोर आली आहे. रामनगर पोलिसांनी त्याला अटक केली असून विकास नाना बरबटे (वय ३५) रा. दावडी असे त्याचे नाव आहे. कामावरून काढून टाकल्याने तो कर्जबाजारी झाला त्यातून त्याने ही चोरी केली.
पुर्वेकडील एका चिकन शॉपचे शटर बनावट चावीने उघडून दुकानातील १८ हजारांची रोकड व मोबाईल लंपास केल्याची घटना २२ जूनला घडली होती. विकास याच दुकानात कामाला होता. चार महिन्यांपूर्वी दुकान मालकाने त्याला कामावरून काढून टाकले होते. काम नसल्याने तो बेरोजगार झाला होता. याचा राग विकासला होता. एकीकडे काम मिळत नसताना त्याच्यावर कर्ज देखील वाढले होते. दऱम्यान चोरी करताना विकास सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाला होता. तो दुकानाच्या परिसरात तोंड बांधून संशयीतरीत्या फिरत होता. हे कॅमेराचे फुटेज दुकान मालकाला दाखविले असता संबंधित व्यक्ती विकास असल्याची माहीती त्यांनी पोलिसांना दिली. रामनगर पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश सानप, पोलिस हवालदार विशाल वाघ, प्रशांत सरनाईक, नितीन सांगळे, शिवाजी राठोड यांच्या पथकाने सीसीटिव्ही व तांत्रिक मदतीने विकास ला दावडी, सोनारपाडा परिसरातून अटक केली.
त्याच्याकडून गुन्हयातील चोरी केलेला मोबाईल आणि रोकड असा २५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहीती वरीष्ठ पोलिस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी दिली. कामावरून काढून टाकल्यामुळे त्याचा बदला घेण्याकरीता तसेच कर्जामुळे हा गुन्हा केल्याची कबुली विकासने दिल्याचीही त्यांनी सांगितले.