लोकसभा निवडणूक: कल्याण डोंबिवलीत आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल
By प्रशांत माने | Published: April 17, 2024 05:14 PM2024-04-17T17:14:35+5:302024-04-17T17:17:07+5:30
होर्डींग्ज काढताना मनपा कर्मचा-यांची झाली दमछाक
प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी कल्याण डोंबिवलीत पहिला गुन्हा दाखल झाला आहे. परवानगी न घेता राजकीय पक्षाचे होर्डींग्ज लावल्याप्रकरणी जाहिरात एजन्सीविरोधात येथील मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. केडीएमसीचे ई प्रभागाचे सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. विशेष बाब म्हणजे १० ते १२ मजली उंचीवर असलेले ४० बाय ४० फुट लांबीचे होर्डींग्ज काढण्यासाठी अग्निशमन विभागाची शिडी असलेला बंब मागविण्यात आला होता.
गुरूवारी संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास निवडणुक विभागाच्या अॅपवर परवानगी विना होर्डींग्ज लावण्यात आला आहे अशी तक्रार आली. तक्रारीत नोंदविलेल्या ठिकाणाचा पत्ता शोधत असताना डोंबिवली पुर्वेकडील कल्याण शिळ रोड, साई सिटी निळजे, याठिकाणी रस्त्यालगत लोखंडी साच्यावर १० ते १२ मजली उंच असा ४० बाय ४० फुट लांबी रूंदी आकाराचा होर्डींग्ज लावलेला आढळुन आला. ४ कोटी पक्की घरे, बांधली आहेत, आणखी बांधली जातील मोदीची गॅरंटी, पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन करा असे त्या होर्डींग्जवर लिहिले होते. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र देखील होते. घटनास्थळी दाखल झालेले केडीएमसीचे सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी मालमत्ता विभागाकडे या होर्डींग्ज बाबत चौकशी केली असता त्यांच्याकडून संबंधित होर्डींग्जची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे समजले. दरम्यान आचारसंहिता भंग करून मालमत्ता विद्रुपिकरण केल्याच्या आरोपाखाली सहाय्यक आयुक्त पवार यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून ए.डि.प्रमोशन अॅडव्हरटायझींग सर्व्हिसेस यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
होर्डींग्ज काढताना मनपा कर्मचा-यांची झाली दमछाक
साधारण १५ मजली उंचीवर तसेच ४० बाय ४० असा भलामोठा संबंधित होर्डींग्ज काढताना केडीएमसीच्या कर्मचा-यांची चांगलीच दमछाक झाली. शिडी असलेली अग्निशमन विभागाचा बंबगाडी मागविण्यात आली होती.पण तीचाही उपयोग झाला नाही. अखेर कर्मचा-यांनी कसबसे ते होर्डींग्ज काढून ते ताब्यात घेतले.