केडीएमसीच्या पाच माजी आयुक्तांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 11:45 AM2022-01-29T11:45:08+5:302022-01-29T11:46:04+5:30
पुनर्विकासात अनियमितता : न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : पश्चिमेकडील केडीएमसी मुख्यालयाच्या नजीक असलेल्या माणिक कॉलनी वसाहतीच्या पुनर्विकासात अनियमितता आणि फसवणूक झाल्याच्या तक्रारीनुसार बाजारपेठ पोलीस ठाण्यात केडीएमसीच्या पाच आयुक्तांसह सहाय्यक संचालक नगररचनाकार, बिल्डर आणि वास्तूविशारद अशा १८ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. माजी नगरसेवक अरुण गीध यांनी याप्रकरणी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
जेथे माणिक कॉलनी वसाहत होती, त्या प्रभागातील तक्रारदार गीध हे माजी नगरसेवक आहेत. या वसाहतीचा पुनर्विकास करताना येथील १३७ कुटुंबांना त्यांच्या मालकी हक्काची चांगली घरे मिळावीत, या उद्देशातून गीध हे पाठपुरावा करत होते. परंतु, वसाहतीच्या ठिकाणी पुनर्विकास सुरू झाल्यानंतर विकासकाने रहिवाशांना त्यांना दिलेल्या क्षेत्रफळाप्रमाणे घरे दिली नाहीत. एफएसआयचा चुकीच्या पद्धतीने वापर करण्यात आला. विकास नियंत्रण नियमावलीचा भंग करून बांधकाम परवानगी देण्यात आली. जानेवारी २००४ पासून तत्कालीन आयुक्त, नगररचना अधिकारी यांना हाताशी धरून त्यांच्याशी संगनमत करून विकासकाने अनियमितता आणि फसवणूक केल्याचा आरोप गीध यांचा आहे. कॉलनीचा विकास करताना पार्किंग, मार्जिन स्पेस तसेच आवश्यक सुविधा देणे गरजेचे होते. याउलट पार्किंगच्या ठिकाणी व्यावसायिक गाळे काढले असून, पार्किंगसाठी जागा ठेवलेली नाही, याकडेही गीध यांनी लक्ष वेधले आहे.
याप्रकरणी महापालिका आयुक्त, पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या. पण कोणीही त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे गीध यांनी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली. त्यांच्यावतीने ॲड. अक्षय कापडिया यांनी युक्तिवाद करताना बांधकाम पुनर्विकासात अनियमितता झाल्याचे मत मांडले. या प्रकरणात काही गैरप्रकार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे मत नोंदवित सहभागी विकासक, वास्तुविशारद, तत्कालीन आयुक्त, सहाय्यक संचालक नगररचना आणि नगररचनाकार अशा एकूण १८ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. यावर गुरुवारी रात्री उशिरा बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, पुढील तपास सुरू आहे. माणिक कॉलनी वसाहतीच्या जागेवर २३ मजली संकुल उभे आहे.
याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास केला जाईल, अशी प्रतिक्रिया बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील यांनी दिली.