पाच रेल्वे स्थानकांत पुरातून सुटकेकरिता मदत दल तैनात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 09:12 AM2021-06-16T09:12:37+5:302021-06-16T09:12:58+5:30
माटुंगा, शीव, कुर्ला, ठाणे, बदलापूर स्थानकांत बोटीतून प्रवाशांची करणार सुटका
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकच्या चोहोबाजूने तुफान पाणी साचले आहे. अशावेळी बोटीतून प्रवाशांची सुटका करण्याकरिता येणारे पूर मदत दल (आरएफआरटी) हे देवदूतांसारखे भासते. पावसाळ्यात माटुंगा, शीव, कुर्ला, ठाणे, बदलापूर या सखल भागातील रेल्वे स्थानकांमध्ये पाच बोटी व पूर मदत दलाचे जवान तैनात केले जाणार आहेत. पावसाळी पाण्यातून ते प्रवाशांची कशी सुटका करणार, याचे मॉकड्रिल मंगळवारी ठाण्यातील तलावपाळी येथे पार पडले. मध्य व पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अलोक कंसल यावेळी हजर होते.
दोन वर्षांपूर्वी उल्हास नदीला मुसळधार पूर आल्याने बदलापूरजवळ रेल्वे अडकली होती. त्यामधील प्रवाशांची सुटका करण्यास बऱ्याच विलंबाने एनडीआरएफची पथके दाखल झाली. मागील आठवड्यात पहिल्याच पावसात शीव, कुर्ला भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. या घटनांमधून धडा घेऊन रेल्वे प्रशासनाने आता बोटी तैनात केल्या आहेत, असे कंसल म्हणाले. प्रत्येक रेल्वे स्थानकापाशी पाच जणांचा समूह हजर राहणार आहे. प्रत्येक पूर मदत दलात एक उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षक आणि ६ इतर कर्मचारी असतात. आतापर्यंत १५ आरपीएफ कर्मचारी (५ महिला आणि १० पुरुष) यांना पुणे एनडीआरएफकडून प्रशिक्षण मिळाले आहे. त्यानुसार आता आरपीएफ जवानांना प्रशिक्षण दिले जात आहे.
ही टीम प्रत्येक पावसाळ्यात दरवर्षी जून ते ऑक्टोबरदरम्यान तत्पर असते. ज्या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे, अशा ठिकाणी किंवा पूरस्थिती निर्माण होण्याचा इशारा दिलेला असेल तेव्हा पथक तैनात केले जाईल. हे पथक नागरी प्रशासन, जीआरपी, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि नियंत्रण कक्ष यांच्या संपर्कात असेल. आरपीएफने रेल्वे पूर मदत दलासाठी एसओपी (नियोजन) तयार केली आहे.
आरपीएफचे महासंचालक अरुण कुमार म्हणाले की, रेल्वेच्या पूर मदत पथक बचाव व मदत कार्यात हे पथक मोलाची कामगिरी बजावेल.
असे आहे पूर मदत पथकाचे कार्य...
ब्ल्यू अलर्ट : जेव्हा पाण्याची पातळी रेल्वे रुळांवर चार इंचाच्या वर पोहोचते, तेव्हा पूर मदत दल सक्रिय होते.
ऑरेंज अलर्ट : पाण्याची पातळी रेल्वे रुळांपासून पाच इंचाच्या वर पोहोचते, तेव्हा दल स्थळापाशी दाखल होते.
रेड अलर्ट : जेव्हा कोणत्याही स्थानकावर पावसाळी पाण्यामुळे ट्रेन थांबवली जाते तेव्हा त्या ठिकाणी पाण्याची पातळी तीन फूट आहे याची खात्री करून मदतकार्य सुरू करते.