Green Water in Dombivali: आश्चर्यचकित व्हाल! चोहोबाजुला पावसाचे गढुळ पाणी तुंबले; पण डोंबिवलीत नाल्यातून हिरवे पाणी वाहू लागले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 07:59 PM2021-07-19T19:59:40+5:302021-07-19T20:00:17+5:30
Green Water in Dombivali: 24 तासाच्या आत उत्पादन प्रक्रिया थांबविण्याची "त्या" कंपनीला प्रदूषण मंडळाची नोटीस
- मयुरी चव्हाण
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : डोंबिवली एमआयडीसी मधील गांधीनगर परिसरातुन चक्क हिरव्या रंगाचा नाला तुडूंब भरून वाहत होता. याबाबतचा व्ह्डिओ येथील नागरिकांनी सोशल मीडियावर शेयर केल्यानं एकच खळबळ उडाली. मुसळधार पडणाऱ्या पावसाचा फायदा घेत कंपनीने केमिकलयुक्त पाणी नाल्यात सोडल्याचा महाप्रताप केला अन पाण्याचा रंग हिरवा (Green Water flowing) झाला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसी प्रशासनाला संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार प्रदूषण मंडळाने कंपनीला 24 तासाच्या आत उत्पादन प्रक्रिया थांबवण्याची नोटीस जारी केली आहे. या वृत्ताला आयुक्त सूर्यवंशी आणि मंडळाच्या अधिका-यांनीही लोकमतशी बोलताना दुजोरा दिला आहे. (Green Water in Dombivali Nala in Rain flood water.)
रायबो फार्म या कंपनीने केमिकलयुक्त पाणी थेट नाल्यात सोडल्याने नाल्यातून हिरव्या रंगाचे पाणी वाहू लागले होते. ही कंपनी फूड कलर तयार करण्याचे काम करते अशी माहिती समोर आली आहे. कंपनीच्या ज्या काही त्रुटी आहेत त्याची पुन्हा चौकशी केली जाणार असून त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल अशी माहिती प्रदूषण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी शंकर वाघमारे यांनी सांगितले.
तसेच या कंपनीचा वीजपुरवठा आणि पाणीपुरवठा खंडित करण्याबाबत संबंधित विभागाला सूचना देखील देण्यात आल्या आहेत. तसेच 24 तासाच्या कंपनीने त्यांचं उत्पादन थांबवावे अशी नोटीस देखील जारी करण्यात आल्याचे वाघमारे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे 24 तासाच्या आत कंपनी उत्पादन प्रक्रिया बंद करते का? तसेच येणाऱ्या काळात प्रदूषण नियंत्रण मंडळ या कंपनीच्या बाबतीत कोणता अंतिम निर्णय घेते ते पाहावे लागेल.