कल्याणच्या आधारवाडी कारागृहात एफएम; बंदीने बजावली रेडिओ जॉकीची भूमिका
By सचिन सागरे | Published: January 25, 2024 06:05 PM2024-01-25T18:05:35+5:302024-01-25T18:06:51+5:30
मुलाखतीदरम्यान कारागृह विभागातील सुधारणा व सोयीसुविधांबाबत गुप्ता यांनी चर्चा केली.
कल्याण : नागपूर, पुणे, मुंबई पाठोपाठ कल्याण जिल्हा कारागृहातही एफएम रेडीओ सेंटर कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. कक्षाच्या उद्घाटन दरम्यान कारागृहातील बंदी सिद्धेश पांचाळ याने रेडिओ जॉकीची भूमिका पार पाडत कारागृह विभागाचे अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांची मुलाखत घेतली. यावेळी, किऑस मशीनचे देखील उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी अधीक्षक आर. आर. भोसले, वरिष्ठ तुरुंगाधिकारी जे. ए. काळे व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. एफएम रेडीओकरीता मुंबई परिसर विपश्यना केंद्र यांचे सहकार्य लाभले.
मुलाखतीदरम्यान कारागृह विभागातील सुधारणा व सोयीसुविधांबाबत गुप्ता यांनी चर्चा केली. कारागृहातील बंद्यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होऊ नये, हा सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन बंद्यांना नियमानुसार देण्यात आलेल्या विविध सोयीसुविधांबाबत मार्गदर्शन केले. तसेच बंद्याच्या पुनर्वसनाकरिता नियमानुसार भविष्यातदेखील असे उपक्रम राबविण्यात येणार असल्याबाबत सांगितले.
कारागृहामध्ये विविध प्रकारच्या गुन्ह्यातील बंदी बंदीस्त असतात. कारागृहात येणाऱ्या प्रत्येक बंद्याच्या मनात नेहमी अस्वस्थता असते. आपला परिवार, भविष्य यांच्या विचारामुळे बंद्यांच्या मनात नकारात्मक भावना निर्माण होते. यापासून थोडासा विरंगुळा म्हणून व बंद्यांना सकारात्मकतेकडे नेण्याकरीता कारागृह एफएम रेडीओचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
एफएम रेडीओच्या माध्यमातून बंद्यांच्या आरोग्याकरीता त्यांनी घ्यावयाची काळजी याबाबत तज्ञांचे मार्गदर्शन, प्रबोधनात्मक कार्यक्रम, मनोरंजना करीता मनपसंद गाण्याचा कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे अधीक्षक आर. आर. भोसले यांनी सांगितले. त्याचबरोबर, संपूर्ण महाराष्ट्र कारगृह विभागात सुरु असलेल्या संगणकीकरणातंर्गत कल्याण कारागृहामध्ये किऑस मशीन बसविण्यात आली आहे. सदर मशिनचेदेखील गुप्ता यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.