मुंबई पाठोपाठ कल्याण डोंबिवली डीप क्लिनिंग मोहिमेला सुरुवात
By मुरलीधर भवार | Published: January 5, 2024 03:19 PM2024-01-05T15:19:58+5:302024-01-05T15:20:48+5:30
महापालिकेच्या आय प्रभाग क्षेत्रात या मोहिमेचा शुभारंभ आज सकाळी पार पडला.
मुरलीधर भवार, कल्याण-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत डीप क्लिनिंग ही मोहिम सुरु केली. मुंबई पाठोपाठ कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतही डीप क्लिनिंग मोहिमेचा शुभारंभ आज करण्यात आला. स्वच्छतेची सुरुवात स्वत:पासून करावी असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी यावेळी केले.
महापालिकेच्या आय प्रभाग क्षेत्रात या मोहिमेचा शुभारंभ आज सकाळी पार पडला. या प्रसंगी सार्वजनिक बांधकम मंत्री चव्हाण यांच्यासह कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, भाजप आमदार गणपत गायकवाड, महापालिका आयुक्त डॉ.इंदूराणी जाखड, अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे, पाेलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर, शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी खासदार शिंदे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पेतील स्वच्छता अभियान हे स्वच्छतेचे महत्व अधोरेखीत करणारे आहे. रस्ते, दुभाजक, सार्वजनिक शौचालये दैनंदिन स्वच्छ ठेवली पाहिजेत. आठवड्याच्या अखेरीस तीन दिवस हा स्वच्छतेचा ड्राईव्ह घ्यावा. आमदार गायकवाड यांनी सांगितले की, नागरीकांचाही सहभाग यात हवा. त्यामुळे या अभियानाला गती मिळू शकते.
या स्वच्छता मोहिमेसाठी खासदार शिंदे यांच्या मदतीतून सुमित फॅसिलीटीज लिमिटेड या संस्थेचे २०० सफाई कर्मचारी कार्यरत होते. रस्ते दुभाजकाची स्वच्छता करणारे तसेच वॉटर स्प्रिंकलींग करणारे पॉवर स्विपर मशीन उपलब्ध करुन देण्यात आले. महापालिकेच्या वतीने २ जेसीबी, ४ एलआरसी वाहने, ३ एसआरसी वाहने, १० घंटा गाड्या, १ जेटींग मशीन, १ जीगफॉग मशीन, ६ डंपर, २ डस्ट मिटीगेशन वाहने, २ पाण्याचे टँकर, १ रोड स्विपर, २ मल्टीजेट फवारणी युनीट याचा वापर करुन स्वच्छता करण्यात आली. ही मोहिम आता दर शनिवारी महापालिका हद्दीतील अन्य प्रभागांमध्येही राबविली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त जाखड यांनी दिली आहे.