कल्याण डोंबिवलीतील ८२ हजार मालमत्ताधारकांना जप्तीच्या नोटिसा; २१५ वाणिज्य मालमत्ताना केला अटकाव
By मुरलीधर भवार | Published: January 6, 2023 06:14 PM2023-01-06T18:14:08+5:302023-01-06T18:14:33+5:30
महापालिकेच्या उत्पन्नाची सगळी मदार ही मालमत्ता करावर असते.
कल्याण- कल्याण डोंबिवली महापालिकेने मालमत्ता कराच्या वसूलीची मोहिम गतीमान केली आहे. ज्या मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर थकविला आहे अशा ८२ हजार ५७१ मालमत्ताधारकांना मालमत्ता विभागाच्या वतीने जप्ती वॉरंटच्या नोटीसा बजावल्या आहे. या नोटिसा पूर्व सूचना स्वरुपाच्या आहे. मालमत्ताधारकाने नोटिस प्राप्त होताच मालमत्ता कर भरल्यास जप्तीची कारवाई टळू शकते याकडे प्रशासनाने लक्ष वेधले आहे.
महापालिकेच्या उत्पन्नाची सगळी मदार ही मालमत्ता करावर असते. महापालिकेने मालमत्ता कराच्या वसूलीचे लक्ष्य ३७५ कोटी रुपये ठेवले आहे. महापालिकेने डिसेंबर महिन्यापर्यत २१९ कोटी रुपये मालमत्ता कराची वसूली केली होती. महापालिकेच्या हाती लक्ष्य पूर्ती करीता केवळ तीनच महिने आहे. मार्च अखेर्पयत महापालिकेस १५६ कोटीचे लक्ष्य गाठायचे आहे. महापालिकेने यंदाच्या वर्षातील मालमत्ता कराची बिले मालमत्ताधारकांना दिली आहेत. एप्रिल ते ऑगस्ट या दरम्यान मालमत्ता कराची संपूर्ण रक्कम भरणा:या मालमत्ताधारकांना मालमत्ता करात पाच टक्के सवल दिली जाते.
मालमत्ता कर वसूलीचा आढावा प्रभारी आयुक्त मंगेश चितळे यांनी आज घेतला. मालमत्ता विभागाने कर वसूलीकरीता धडक मोहिम सुरु केली आहे. त्यासाठी मालमत्ता विभागाचे प्रमुख विनय कुळकर्णी यांनी पुढाकार घेतला आहे. मालमत्ता थकबाकीदारांना जप्ती वॉरंटच्या पूर्व सूचना देणा:या नोटिसा बजावल्या आहेत. महापालिका हद्दीत २ लाख ९२ हजार मालमत्ताधारक आहेत. त्यापैकी ८२ हजार मालमत्ताधारकांना नोटिसा बजावल्या आहेत.
२ ते ५ जानेवारी दरम्यान महापालिकेने २१५ आस्थापनांच्या विरोधात अटकावणीची कारवाई केली आहे. याच स्वरुपाची कारवाई वाणिज्य मालमत्तांच्या विरोधात अधिक तीव्र स्वरुपात केली जाणार असल्याचा इशारा मालमत्ता कर वसूली विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. मालमत्ता जप्तीची कटू कारवाई टाळण्यासाठी वेळेत मालमत्ता कर भरावा असे आवाहन मालमत्ता कर वसूली विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.