माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर; जितेंद्र आव्हाड यांची घेतली भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2022 03:57 PM2022-02-12T15:57:05+5:302022-02-12T15:57:24+5:30
स्वत: पाटील यांनी ते पाच सहा नगरसेवकांना घेऊन राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याचे भेटी पश्चात सांगितले.
कल्याण- कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज कार्यकर्ता मेळावा होता. या मेळाव्यास गृह निर्माण जितेंद्र आव्हाड आले होते. यावेळी माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी आव्हाड यांची भेट घेतली. त्यामुळे ते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
स्वत: पाटील यांनी ते पाच सहा नगरसेवकांना घेऊन राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याचे भेटी पश्चात सांगितले. 2015 साली पाटील हे अपक्ष नगरसेवक पदी आडीवली ढोकळी प्रभागातून निवडून आले होते. त्यावेळी त्यांनी भाजपला समर्थन केले होते. पाटील यांनी आव्हाड यांची भेट घेतल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या आहे. याबाबत आव्हाड यांना विचारणा केली करण्यात की निवडणूकीच्या तोंडावर आणखीन किती नगरसेवक तुमच्या संपर्कात आहेत. तर त्यावर आव्हाड यांनी सांगितले की, कोण आमच्या संपर्कात आहे हे आधीच सांगितले तर आमचे राजकारण संपुष्टात येईल. त्यामुळे वेळ आल्यावर आमच्याकडे कोण येणार हे लवकर समजणार आहे.
निवडणूकीच्या तोंडावर शिवसेनेने आधीच मिशन लोटसला धक्का देत आत्तार्पयत चार नगरसेवक भाजपचे फोडले आहे. भाजपच्या महेश पाटील, सुनीता पाटील, सायली विचारे आणि विशाल पावशे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. ही फोडाफोड पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृ़त्वाखाली कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सुरु करुन शिवसेनेत भाजपच्या नगरसेवकांना घेण्याची सुरुवात केली आहे. तर आव्हाड यांनी 2015 साली राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकाना पुन्हा राष्ट्रवादीत घेण्याची खेळी सुरु केली आहे. त्यामुळे शिवसेनेत गेलेले नगरसेवक पुन्हा राष्ट्रवादीत येणार का याविषयी चर्चा सुरु झाली आहे.
शिवसेना मिशन लोटसला डॅमेज करीत आहे तर आव्हाड हे शिवसेनेच्या नगरसेवकांना राष्ट्रवादीत खेचण्याचे काम करीत आहेत. ठाण्यात आव्हाड विरुद्ध शिंदे असे राजकारण विविध मुद्यावरुन रंगलेले असताना आत्ता कल्याण डोंबिवलीतही शिवसेनेच्या पाठोपाठ आव्हाड यांनी मिशन कल्याण डोंबिवलीत राष्ट्रवादी मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. याठिकाणीही त्यांचा सामना शिंदे यांच्यासोबत होणार असल्याचे दिसून येत आहे.