शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत देसाई यांचे निधन
By प्रशांत माने | Published: March 3, 2023 06:44 PM2023-03-03T18:44:34+5:302023-03-03T18:45:08+5:30
शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत देसाई यांचे निधन झाले आहे.
डोंबिवली: मुंबई परळ येथील शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत देसाई यांचे आज सकाळी ११.३० च्या सुमारास निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय ८३ होते. कालपासून त्यांना श्वास घेण्याचा त्रास होत असल्याने त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना अन्य खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्याठिकाणी नेत असताना कार्डीयाक रूग्णवाहीकेचा रस्त्यातच बिघाड झाल्याने दुसरी रूग्णवाहीका मागविण्यात आली. रूग्णवाहीकेत बिघाड झाल्याने वेळेवर उपचार मिळाले नाहीत आणि त्यात देसाई यांचा मृत्यू ओढावल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. या घडलेल्या प्रकाराबाबत सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
देसाई १९९५ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या तिकिटावर परळ मतदारसंघातून निवडून आले होते. गेले दहा वर्षापासून ते डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा मैदान परिसरातील काशीकुंज या इमारतीत वास्तव्याला होते. काल सकाळी त्यांना श्वास घ्यायला त्रास झाल्याने त्यांच्यावर पुर्वेकडील टिळकरोडवरील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते. ते ऑक्सिजनवर होते. दरम्यान आज सकाळी त्यांची प्रकृती अधिकच गंभीर बनल्याने त्यांना व्हेंटीलेटर उपचाराची आवश्यकता होती.
परंतू रूग्णालयात ती सुविधा नसल्याने त्यांना अन्यत्र हलविण्याच्या सूचना त्यांच्या कुटुंबाला देण्यात आल्या. एमआयडीसीतील एका खाजगी रूग्णालयात व्हेंटीलेटरची सुविधा असल्याने त्याठिकाणी घेऊन जाण्याचा निर्णय झाला. त्यासाठी खाजगी कार्डीयाक रूग्णवाहीका मागविण्यात आली. परंतू रूग्णालयात नेत असताना त्या रूग्णवाहीकेत बिघाड होऊन ती बंद पडली. कुटुंबाने रूग्णवाहीकेला धकका मारत ती चालू करण्याचा प्रयत्न केला पण ती चालू झाली नाही. अखेर दुसरी रूग्णवाहीका मागविण्यात आली आणि त्यांना रूग्णालयात दाखल केले गेले परंतू तत्पुर्वीच देसाई यांची प्राणज्योत मालवली होती. देसाई यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सून, जावई, नातवंड असा परिवार आहे. रात्री देसाई यांच्या पार्थिवावर येथील शिवमंदिर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान रूग्णवाहीकेच्या बिघाडाबाबत रामनगर पोलिस ठाण्यात हलगर्जीपणाची तक्रार दाखल करणार असल्याचे देसाई यांचा मुलगा ऋषिकेश यांनी सांगितले.