केडीएमसीचे माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांनी भाजपला दिली सोडचिट्टी
By मुरलीधर भवार | Published: January 16, 2024 04:16 PM2024-01-16T16:16:25+5:302024-01-16T16:16:46+5:30
पत्नी कविता म्हात्रे यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी यांचाही राजीनामा
डोंबिवली-कल्याण डाेंबिवली महापालिका माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांनी त्यांच्या पत्नी कविता म्हात्रे यांच्यासह दोन
प्रभागातील कार्यकर्ते पदाधिकाऱ््यांनी भाजपच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर म्हात्रे यांचा राजीनामा हा चर्चेचा विषय ठरला आहे. म्हात्रे यांनी भाजपच्या सदस्य पदाचा राजीनामा देऊन भाजपला धक्का दिला आहे. त्यामुळे विकास म्हात्रे आत्ता कोणत्या राजकीय पक्षाची कास धरणार या विषयावर चर्चा सुरु झाली आहे.
कल्याण पूर्वेतील आमदार गणपत गायकवाड यांची शिवसेना शिंदे गटा सोबत धूसफूस सुरु आहे. या राजकीय पार्श्वभूमीवर विकास म्हात्रे यांचा राजीनामा हा लक्षवेधी ठरला आहे. म्हात्रे हे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जात होते. त्यामुळे म्हात्रे यांचा राजीनामा हा चव्हाण यांना देखील धक्का देणारा ठरला आहे. म्हात्रे यांच्या प्रभागात रस्ते विकासाची कामे केली जात नाही. त्यासाठी निधीची मागणी करुन देखील निधी उपलब्ध होत नाहीत. याविषयी म्हात्रे यांनी वारंवार खंत व्यक्त केली होती.
म्हात्रे यांनी पक्ष सदस्य पदाच्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, राजूनगर आणि गरीबाचा वाडा प्रभागात अपुऱ््या निधीमुळे विकास खुंटला आहे. वारंवार पत्रव्यवहार करुन देखील दखल घेतली जात नाही. अनेक रस्त्याची कामे अपुरी आहेत. पावसाळ्यात रस्त्यावर खडड्यांचे साम्राज्य पसरल्याने नागरीकांमध्ये आमच्या विरोधात असंतोष आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ््यांना ही नागरीकांच्या रोषाला सामाेरे जावे लागते. त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षाप्रति नाराज झाले आहे. प्रभागातील नागरीक उघडपणे बोलू लागले आहेत की इतर प्रभागात विकास कामे झपाट्याने होत आहेत.
आपल्या पक्षाचे केंद्रात आणि राज्यात सरकार असताना आपल्या प्रभागाचा विकास का होत नाही. अनियमित पाणी पुरवठयाची समस्या आहे. त्याविषयी वरिष्ठांकडे लेखी व तोंडी पाठपुरावा करुन अद्याप दखल घेतली गेली नाही अशा अनेक समस्या नागरीकांना भेडसावत आहेत. त्यामुळे आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून कमी पडत आहोत. त्यामुळे मी, माझी पत्नी कविता आणि पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी राजीनामा देत आहोत. हा राजीनामा त्यांनी भाजप पश्चिम मंडळ अध्यक्षाकडे दिला आहे.