किल्लेबांधणी स्पर्धेमध्ये किल्ला विजयदुर्गने पटकाविला प्रथम क्रमांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 11:50 PM2020-11-23T23:50:15+5:302020-11-23T23:50:41+5:30
जाणता राजा युवा प्रतिष्ठानची बाजी
n लोकमत न्यूज नेटवर्क
डाेंबिवली : छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचे महत्त्व, पावित्र्य व इतिहासातील मराठ्यांच्या योगदानाचे महत्त्व आजच्या पिढीपर्यंत पोहोचावे व गडकोटांची आवड त्यांच्यात निर्माण व्हावी म्हणून फक्त राजे प्रतिष्ठानतर्फे किल्लेबांधणी स्पर्धा २०२० चे आयोजन करण्यात आले होते. त्याचा पारितोषिक वितरण सोहळा शनिवारी सागाव येथे पार पडला. जाणता राजा युवा प्रतिष्ठानने साकारलेली विजयदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली.
किल्लेबांधणी स्पर्धेचे हे दुसरे वर्ष होते. फक्त राजे प्रतिष्ठान, सांगावेशवर मंडळ, शिवप्रलय लाठीकाठी संस्कारवर्ग, शिवसाधना समूह डोंबिवली, आयकॉन प्रतिष्ठान, जाणता प्रतिष्ठान ठाकुर्ली, हिंदवी स्वराज्य ग्रुप, राजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आदींनी पारितोषिक सोहळा आणि व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन केले होते. किल्ले स्पर्धांमध्ये द्वितीय क्रमांक नवयुग मित्रमंडळाने साकारलेल्या उंदेरी- खांदेरी या किल्ल्याच्या प्रतिकिृतीला मिळाला. तर, तृतीय क्रमांक दत्तनगर बॉइज यांच्या किल्ला मल्हारगड, चतुर्थ क्रमांक ओम निवास सो. ग्रुपच्या किल्ला विजयदुर्ग, पाचवा क्रमांक स्वामी विवेकानंद सो. ग्रुपच्या विजयदुर्ग किल्ला प्रतिकृतीला मिळाला. कार्यक्रमाला कर्ण जाधव, लक्ष्मण मिसाळ, सुरज म्हात्रे, प्रतीक पाटील, प्रवीण देवडा आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे पदाधिकारी प्रकल्प चव्हाण, अश्विन पवार, वैभव बोलीये, शुभम वारेशी, श्रीनिवास वांगडे, चैताली चव्हाण, श्रद्धा पाटील, मृणाली मोहिते, विशाखा राणे आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
बालकलाकारांनाही प्राेत्साहन
किल्लेबांधणी स्पर्धेत बालकलाकारांनीही सहभाग घेतला होता. पुढच्या वर्षी त्यांना किल्ले बनवण्यासाठी अजून प्रोत्साहन मिळावे, या हेतूने आयोजकांच्या वतीने सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात लाठीकाठी, तलवारीचे प्रात्यक्षिक सादरीकरण झाले. तसेच देव-देश-धर्म-धर्मशिक्षण, हिंदू संस्कृती आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि आजची तरुण पिढी यावर शिल्पकार गुणेश अडवळ यांचे व्याख्यानही झाले.