कल्याण पूर्वेत प्रभू श्रीराम मंदिर प्रतिकृतीची पायाभरणी
By प्रशांत माने | Published: January 7, 2024 06:02 PM2024-01-07T18:02:54+5:302024-01-07T18:03:01+5:30
श्रीराम मंदिर उभे राहणे हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंद, अभिमानाचा क्षण - खासदार श्रीकांत शिंदे
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण: देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने ५०० वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर अयोध्येत प्रभू श्रीरामांचे मंदिर उभे राहत आहे. हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंद आणि अभिमानाचा क्षण असणार असल्याची भावना कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खासदार शिंदे यांच्या संकल्पनेतून कल्याण पूर्वेमध्ये अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात येत आहे. याच्या पायाभरणी सोहळयामध्ये शिंदे बोलत होते.
२२ जानेवारीला आयोधेमध्ये प्रभू श्रीराम मंदिरात विराजमान होणार असून देशभरात दिवाळी साजरी केली जाणार आहे. मात्र प्रत्येक भक्ताला तिकडे जाणे शक्य होणार नाही. त्यामुळे कल्याण पूर्वेतील चक्कीनाका स्थित गुण गोपाल मैदानात श्रीराम मंदिराची ही भव्य प्रतिकृती साकारण्यात येत असल्याचे शिंदे म्हणाले. कल्याण डोंबिवलीतील रामभक्तांनी याठिकाण येऊन दर्शन घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
शिंदे पुढे म्हणाले प्रभू श्रीराम मंदिराच्या सोहळ्यानिमित्त ज्याप्रकारे अयोध्येत उत्साह असेल अगदी तसाच उत्साह याठिकाणी साजरा केला जाईल. पुढील आठवडाभर याठिकाणी गीत रामायण, हरिपाठ यांसारखे अनेक धार्मिक कार्यक्रमही आयोजित केले आहेत. कला दिग्दर्शक अमन विधाते ही प्रतिकृती साकारणार आहेत अशी माहीती खासदार शिंदे यांनी दिली.
‘ती’ देणगी महाराष्ट्रातील करोडो रामभक्तांच्या वतीने
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना पक्ष, आणि महाराष्ट्रातील तमाम रामभक्तांच्या वतीने एक छोटेसे योगदान म्हणून अयोध्येतील श्रीराम मंदिर ट्रस्टला आपण ११ कोटी रुपयांची देणगी दिल्याचे खासदार शिंदे यावेळी म्हणाले. राम मंदिरासाठी अनेक कारसेवकांनी प्राणाची आहुती दिली आहे. अनेकांनी संघर्ष केला आहे. बाळासाहेबांनी राम मंदिराचे स्वप्न पाहिले होते, करोडो रामभक्तांनी या राम मंदिराचे स्वप्न पाहिले होते. राम मंदिरासाठी मोठा लढा लढणारे चंपत राय यांच्याकडे ही देणगी आपण सुपूर्द केल्याचे शिंदे यांनी सांगितले.