चार महिन्यांचं बाळ आजोबांच्या हातून निसटलं अन् नाल्यात वाहून गेलं, ठाकुर्ली-कल्याण रेल्वे मार्गावरील घटना
By अनिकेत घमंडी | Published: July 19, 2023 05:33 PM2023-07-19T17:33:40+5:302023-07-19T17:35:09+5:30
योगीता शंकर रुमाल (25) असे संबंधित पालकाचे नाव आहे. त्या भिंवंडी येथील आहेत. तसेच वाहून गेलेले बाळ हे चार महिन्यांची मुलगी असल्याचे समजते.
डोंबिवली : आजोबांकडून (आईचे वडील) चार महिन्याचे बाळ नाल्यात पडून वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना ठाकुर्ली-कल्याण रेल्वे मार्गावरील नाल्यावर घडल्याची प्राथमिक माहिती कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी दिली आहे. योगीता शंकर रुमाल (२५) असे संबंधित पालकाचे नाव आहे. त्या भिंवंडी येथील आहेत. तसेच वाहून गेलेले बाळ हे चार महिन्यांची मुलगी असल्याचे समजते.
कल्याण आणि डोंबिवली परिसरात आज सकाळपासूनच सुरू असलेल्या दमदार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. अनेक गाड्या ट्रॅकवर ऊभ्या होत्या. अंबरनाथ लोकल वाहतूकही ठप्प झाली होती. अंबरनाथ लोकल ठाकुर्ली आणि कल्याणदरम्यान जवळपास दोन तास उभी होती. लोक उभी असल्याने काही प्रवासी गाडीतून उतरुन ट्रॅकवरुन कल्यानच्या दिशेने चालत जात होते. याच दरम्यान ही दूर्दैवी घटना घडली.
चार महिन्यांचं बाळ आजोबांच्या हातून निसटलं अन् नाल्यात वाहून गेलं, ठाकुर्ली-कल्याण रेल्वे मार्गावरील घटना#Thakurli_Kalyan#Dombivlipic.twitter.com/s6zVkJLTsV
— Lokmat (@lokmat) July 19, 2023
आजोबांच्या हातून निसटलं बाळ -
कल्याणच्या दिशेने जात असलेल्या या प्रवाशांमध्ये एक आजोबा संबंधित चार महिन्यांच्या बाळाला घेऊन चालत होते. सोबत बाळाची आईही होती. मात्र अचानक आजोबांच्या हातून बाळ निसटून नाल्यात पडले आणि वाहून गेले. यानंतर काही लोकांनी नाल्याच्या दुसऱ्या बाजुला जाऊन ते बाळ शोधण्याचाही प्रयत्न केला. मात्र बाळ सापडले नाही.
राज्यासह मुंबई परिसरात मुसळधार पाऊस -
राज्यभरात मुंबई आणि परिसरात आज पहाटेपासून दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. याशिवाय पुणे, सातारा, कोल्हापूर, कोकण, अहमदनगर, वाशीम, गडचिरोली आदी ठिकाणीही जोरदार पाऊस होत आहे. हवामान विभागाने मुंबई, पुण्यासह काही जिल्ह्यांना रेड अलर्ट देखील जारी केला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १९ जुलैसाठी पालघर, रायगड, पुणे, सातारा या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे तर मुंबई, ठाणे, नाशिक, रत्नागिरी, कोल्हापूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांसाठी हवामान विभाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. २० जुलै रोजीही मुंबई, पुण्यासह काही जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. २१ जुलै रोजी पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट दिला आहे.