शाळेच्या आरक्षित जागेवर उभी केली चार मजली बेकायदा इमारत, केडीएमसीने चालविला हातोडा
By मुरलीधर भवार | Published: March 23, 2024 05:16 PM2024-03-23T17:16:40+5:302024-03-23T17:17:42+5:30
महापालिका आयुक्त इंदूराणी जाखड यांच्या आदेशानुसार सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी ही कारवाई केली आहे.
कल्याण- कल्याण पूर्वेतील आडीवली परिसरात शाळेसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर चार मजली बेकायदा इमारत उभारण्यात आली होती.
ही बेकायदा इमारत पाडण्याची कारवाई आज करण्यात आली.
महापालिका आयुक्त इंदूराणी जाखड यांच्या आदेशानुसार सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी ही कारवाई केली आहे. ही बेकायदा इमारत पाडण्याचे काम कामगार, जेसीबी आणि ग’स कटरच्या सहाय्याने करण्यात आले. शाळेसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर शिवसागर यादव याने बेकायदा बांधकाम करुन चार मजली इमारत उभारली होती. महापालिकेने बेकायदा इमारत पाडण्याची कारवाई केल्याने बेकायदा बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
महापालिका हद्दीत शाळा, रुग्णालये, क्रिडांगण आदीसाठी आरक्षित भूखंड आहे. त्याचे आरक्षण महापालिकेच्या विकास आराखड्यात नमूद आहे. मात्र हे आरक्षित भूखंड महापालिकेने ताब्यात घेण्याची कार्यवाही केलेली नाही. ते मोकळे आहे. या आरक्षित भूखंडांना पत्रे किंवा तारांचे कुंपण मारुन ते संरक्षित केले जाणे आवश्यक आहे. महापालिकेकडून ही कारवाई केली जात नसल्याने बेकायदा बांधकाम करणारे अशा प्रकारच्या आरक्षित भूखंडावर चार ते सात मजल्याच्या बेकायदा इमारती बांधून महापालिकेसह नागरीकांची फसवणूक करीत आहे. अशा प्रकारच्या बेकायदा इमारतीवर सहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी पोलिस बंदोवस्त न घेता धडक कारवाई केली आहे.