कल्याणच्या एपीएमसी फूल मार्केटमध्ये चार दिवसात चार हजार २५४ क्विंटल फुलांची विक्री
By सचिन सागरे | Published: April 9, 2024 05:53 PM2024-04-09T17:53:57+5:302024-04-09T17:54:20+5:30
एपीएमसी फुल मार्केटमध्ये चार दिवसात चार हजार २५४ क्विंटल फुलांची विक्री झाल्याची माहिती एपीएमसी मार्केट इन्चार्ज निवृत्ती चकोर यांनी दिली.
कल्याण : गुढीपाडव्याच्या निमित्ताने कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली होती. गुढीपाडव्याला होणारी मागणी लक्षात घेऊन केशरी आणि पिवळ्या झेंडूच्या फुलांची मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आवक झाली. असे असले तरी, पिवळ्या झेंडूपेक्षा महाग असलेल्या केशरी झेंडूला सर्वात जास्त मागणी होती. एपीएमसी फुल मार्केटमध्ये चार दिवसात चार हजार २५४ क्विंटल फुलांची विक्री झाल्याची माहिती एपीएमसी मार्केट इन्चार्ज निवृत्ती चकोर यांनी दिली.
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत असलेल्या फुल मार्केटमध्ये संध्याकाळी ६ वाजल्यापासून फुलांची आवक सुरू होते. पहाटे ३ वाजल्यापासून घाऊक विक्रेते याठिकाणी फुलांच्या खरेदीसाठी गर्दी करतात. सण, समारंभाच्या निमित्ताने झेंडूच्या फुलांना सर्वाधिक मागणी असते. पाडव्याच्या निमित्ताने गेल्या चार दिवसांपासून फुलांच्या खरेदीसाठी गर्दी दिसत होती. शनिवारी मार्केटमध्ये फुलांची मागणी वाढल्याने दर देखील वाढले. हीच संधी साधत व्यापाऱ्यांनी रविवारी झेंडूच्या फुलांची जास्त आवक केली. यामुळे, फुलांचे दर देखील काही प्रमाणात कमी झाले. या दोन दिवशी अनेकांना सुट्टी असल्याने दोन दिवस आधीच फुलांची खरेदी करण्यात आली. यामुळे, सोमवार आणि पाडव्याच्या दिवशी मार्केटमध्ये फुलांची मागणी म्हणावी तशी झाली नसल्याने फुलांचे दरही कमी झाल्याचे पाहायला मिळाले.
सणाच्या पार्श्वभूमीवर फुलांची मागणी वाढत असल्याने, शेतकरी मागणीनुसार फुलांचा पुरवठा करीत असतात. अनेक दिवस राखून ठेवलेली फुले सणाच्या निमित्ताने बाजारात पाठवली जातात. ज्या ठिकाणी मालाला किमत असते मार्केटला व्यापारी प्राधान्य देत असतात. त्यामुळे, शनिवारी फुलांच्या दरात वाढ झाल्याने अनेक व्यापाऱ्यांनी एपीएमसी मार्केटकडे धाव घेतली. त्यामुळे फुलांची आवक वाढल्याने दर कमी झाल्याचे फुल विक्रेत्यांचे म्हणणे आहे.