करणीच्या नावाखाली ३१ लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 07:47 AM2022-01-24T07:47:32+5:302022-01-24T07:48:01+5:30
पवन याने त्याच्या अंगात इच्छामाता सप्तश्रृंगीदेवी संचारत असल्याचे भासविले. विश्वास संपादन करण्यासाठी त्याने स्वत:च्या हातातून कधी खडीसाखर, कधी कुंकू व त्यामध्ये सप्तश्रृंगी देवीची प्रतिमा काढून दाखविली
डोंबिवली : करणीची बाधा काढण्याच्या नावाखाली तब्बल ३२ लाख १५ हजार ८७५ रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली जळगाव जिल्ह्यातील भडगावातील शनी चौक येथील पवन बापूराव पाटील (वय २८) विरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कळवा येथील प्रियांका राणे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
पवन याने त्याच्या अंगात इच्छामाता सप्तश्रृंगीदेवी संचारत असल्याचे भासविले. विश्वास संपादन करण्यासाठी त्याने स्वत:च्या हातातून कधी खडीसाखर, कधी कुंकू व त्यामध्ये सप्तश्रृंगी देवीची प्रतिमा काढून दाखविली. पुढे त्याने प्रियांका, तिचा भाऊ आणि आईला तुमच्यावर कोणीतरी करणी केल्याचे सांगितले. करणी काढण्यासाठी खर्च करावा लागेल असे सांगून, त्याने प्रियंका आणि तिच्या आईच्या बँक खात्यातून ३१ लाख सहा हजार ८७४ रुपये स्वत:च्या बँक खात्यात ऑनलाइनद्वारे ट्रान्सफर केले. त्याचबरोबर एक लाख नऊ हजार रूपये किंमतीच्या भेटवस्तूही घेतल्या. पवनने ३२ लाख १५ हजार ८७४ रुपयांची फसवणूक करून आमचा विश्वासघात केल्याचा आरोप प्रियांका हिने तिच्या तक्रारीत केला आहे. हा प्रकार डिसेंबर २०१९ ते २१ जानेवारी २०२२ या कालावधीत डोंबिवली पूर्वेकडील न्यू आयरे रोडला तिच्या आईच्या घरात घडल्याकडे लक्ष
वेधले आहे.