'बाळासाहेबांनी धनुष्यबाणाला प्रतिष्ठा मिळवून दिली, चिन्ह गोठवणं हे अत्यंत क्लेशदायक'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2022 02:41 PM2022-10-09T14:41:04+5:302022-10-09T14:41:20+5:30
शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर पत्रकारांशी बोलताना माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी रविवारी डोंबिवलीतील कार्यक्रमात खंत व्यक्त केली.
प्रशांत माने
डोंबिवली: सरसेनापती बाळासाहेबांनी ज्या धनुष्यबाणाला प्रतिष्ठा मिळवून दिली, त्याच्या जोरावर महाराष्ट्रामधील अनेक सत्ता केंद्रांवर त्यांनी सत्ता मिळवली. राज्य सरकारमध्ये त्यांचे मुख्यमंत्री झाले. ही वर्षानुवर्षाची पुण्याई आहे ती दोघांच्या भांडणांमध्ये गोठवली गेली, यापेक्षा दुर्दैवी प्रसंग नसावा. याला कोण जबाबदार आहे, कोण नाही, हे तर निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यावरच समजेल. परंतु, तात्पुरते का होईना निवडणूक चिन्ह गोठवणं हे अत्यंत क्लेशदायक आहे अशी खंत शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर पत्रकारांशी बोलताना माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी रविवारी डोंबिवलीतील कार्यक्रमात व्यक्त केली.
आनंद कल्याणकारी सामाजिक संस्थेच्या वतीने लेवा पाटील समाजातील लेखक खेमचंद पाटील लिखित ‘लेवा साहित्यिक रत्ने’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा व लेवा साहित्यिकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्र माला माजी महसूल मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे उपस्थित होते. शिवसेनेच्या निवडणूक चिन्ह गोठवल्याच्या मुद्यावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंग प्रकरणावर पुणे पोलिसांकडून सादर झालेल्या क्लोजर रिपोर्टवर देखील भाष्य केले. रश्मी शुक्ला ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांना भेटल्या. त्याच दिवशीच त्यांना क्लीन चीट मिळेल असं वाटलं होते. माझाही फोन ६८ दिवस टॅप करण्यात आला होता तो कोणत्या कारणासाठी टॅप करण्यात आला याची अजूनही मला कल्पना देण्यात आलेली नाही. एफआर दाखल झालेला आहे चौकशी सुरू आहे असे सांगण्यात येते. शुक्ला त्या कालखंडात प्रमुख होत्या म्हणून त्यांना जबाबदार धरण्यात आले होते आता त्यांना क्लीन चीट दिलेली आहे त्यामुळे आता या केसचं भवितव्य अंधारात आहे असल्याचे खडसे म्हणाले. या कार्यक्रमाला व्याकरणाचार्य भक्तिकिशोर शास्त्री यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
नियम घटनेचा चोळामोळा - चौधरी
केंद्रातील यंत्रणांनी कायदा आणि नियम घटनेचा चोळामोळा करायचा ठरवल असेल तर काय बोलायचे असे प्रतिपादन काँग्रेसचे रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार शिरीष चौधरी यांनी केले. केंद्राकडून या देशाची घटना तसेच स्वायत्त यंत्रणा देखील चोळामोळा करून पायाखाली रगडायचं काम जर सुरू असेल तर देशाच्या जनतेने याचा विचार करावा असे चौधरी म्हणाले. दरम्यान चौधरी यांनी निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह गोठवल्याबाबत आमचे वरीष्ठ नेते प्रतिक्रिया देतील असे सांगत त्यावर बोलण्यास नकार दिला.