डाेंबिवलीत आणखी चार स्मशानभूमींमध्ये हाेणार काेराेनाच्या मृतांवर अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 11:57 PM2021-05-01T23:57:07+5:302021-05-01T23:57:18+5:30
विनामूल्य सेवा : तासंतास करावा लागणारा विलंब टळणार
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : केडीएमसी हद्दीतील कोरोना रुग्णांची संख्या घटत असली तरी, दररोज ८ ते ९ रुग्णांचा मृत्यू होत आहे. तसेच अन्य मृतांचेही प्रमाण पाहता डोंबिवलीतील स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी विलंब होत असल्याचा तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. ‘लोकमत’ने या संदर्भात वृत्त प्रसिद्ध केले होते. मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी त्याची दखल घेत टिटवाळा येथे काळू नदीच्या काठावरील स्मशानभूमी, ठाकुर्ली पूर्वेतील चोळे स्मशानभूमी आणि डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव आणि कुंभारखाणपाडा स्मशानभूमीत कोविड मृतांसाठी लाकडावर विनामूल्य शवदाहिनीची सोय करण्याचे आदेश दिली आहेत.
केडीएमसी हद्दीत कोविड मृतांवर अंत्यसंस्कारासाठी कल्याणमधील मुरबाड रोड बैलबाजार, लालाचौकी आधारवाडी, विठ्ठलवाडी, तर डोंबिवलीत शिवमंदिरानजीकची वैकुंठ स्मशानभूमी, पाथर्ली स्मशानभूमी या सहा ठिकाणी गॅस शवदाहिन्यांसह लाकडावरील बर्निंग स्टॅण्डवर विनामूल्य सेवा उपलब्ध आहे. मात्र, या स्मशानभूमींवर ताण येत होता. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी विलंब होत होता. याबाबत ‘लोकमत’च्या, ‘हॅलो ठाणे’मध्ये २१ एप्रिलला ‘डोंबिवलीत अंत्यसंस्कारासाठी मृतदेह तासनतास वेटिंगवर’ या मथळ्याखाली नागरिकांची व्यथा मांडणारे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मनपा प्रशासनाने त्याची दखल घेत आता टिटवाळा, चोळे आणि पश्चिमेतील मोठागाव आणि कुंभारखाणपाडा स्मशानभूमीतही कोविड मृत्यूंसाठी लाकडावर विनामूल्य शवदहनाची सुविधा आता केडीएमसीने उपलब्ध करून दिली आहे.
इतर ठिकाणीही टप्प्याटप्प्याने सुविधा
आगामी काळात इतर स्मशानभूमींतही कोविड मृतांसाठी लाकडावर विनामूल्य शवदहनाची सोय टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कोविड रुग्णालयात मृत्यू झालेल्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार नजीकच्या स्मशानभूमीत करण्याबाबत मनपा व खासगी कोविड रुग्णालय प्रमुखांना कळविले असल्याचेही मनपाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.