रेल्वे प्रवासात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 11:55 PM2020-11-26T23:55:57+5:302020-11-26T23:56:18+5:30
स्टीकर्सना कुणी नाही जुमानत
डोंबिवली : दिवाळीनंतर कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने सरकारी यंत्रणांपुढील पेच वाढला आहे. त्यातच लोकलचे प्रवासीही वाढल्याने सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडत आहे. त्यामुळे दोन प्रवाशांमध्ये अंतर राखण्याचे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले होते. एकाआड एक आसन सोडून बसण्याबाबत जनजागृती करण्यासाठी आसनांना स्टीकर्स लावण्यात आले. मात्र, त्यांचा काहीही फायदा झाला नसल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आधी एसटी तसेच विविध महापालिकांच्या परिवहनसेवेच्या बसमध्येही लहान आसनांवर एक, तर मोठ्या आसनांवर दोन प्रवाशांनी बसून प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले. मात्र, वाढत्या प्रवाशांच्या लोंढ्यामुळे या नियमांचे पालन करणे शक्य झाले नाही.
लोकलमध्येही सकाळी आणि सायंकाळी ठरावीक वेळेला प्रवाशांची गर्दी होत आहे. मिळेल त्या लोकलने प्रवास करताना प्रवासी डब्यांतील गर्दीचा विचार करत नाहीत. तसेच जागा असेल तिथे ते बसतात. प्रवासात सोशल डिस्टन्सिंग पाळले जावे, एकमेकांच्या बाजूला खेटून प्रवाशांनी बसू नये, यासाठी स्टीकर्स लावलेले असले, तरी त्याचे पालन करण्याकडे प्रवाशांचा कल नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी, शिस्त लावण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत प्रवासी संघटनांनी व्यक्त केले. लोकलच्या आसनांवर स्टीकर्स लावून जागृती होईल, पण नियमांचे पालन मात्र होणार नाही. त्यामुळे प्रवाशांनीही सावधगिरी बाळगून प्रवास करावा, रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनदेखील संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
‘सर्वांसाठी लोकल सुरू करा’
nसर्वांसाठी लोकल सुरू करावी, या मागणीसाठी उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी बुधवारी राज्य शासनाच्या आपत्ती विभागाच्या सचिवांची भेट घेतली. यावेळी संघटनेच्या मागण्यांचे निवेदन देशमुख यांनी त्यांना दिले. त्यावर त्यांनीही बघू, करू, असे आश्वासन दिल्याचे देशमुख म्हणाले. प्रवासी संघटनेची बाजू ऐकून घेतल्याबद्दल त्यांनी राज्य शासनाचे आभार मानले.