काेराेनाच्या दुसऱ्या लाटेवर केडीएमसी निवडणुकीचे भवितव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2020 05:22 AM2020-11-16T05:22:17+5:302020-11-16T05:22:28+5:30
जाणकारांचे मत : डिसेंबर-जानेवारीत लाटेची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कोरोनामुळे केडीएमसीची निवडणूक लांबणीवर पडली आहे. मार्च-एप्रिलमध्ये निवडणूक होण्याचे संकेत मिळत आहेत. एकीकडे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असताना दुसरीकडे डिसेंबर-जानेवारीमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रादुर्भाव कमी झाला असला, तरी केडीएमसी निवडणुकीचे भवितव्य या लाटेवरच अवलंबून असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे.
ऑक्टोबर २०१५ मध्ये केडीएमसीची निवडणूक झाली होती. त्यामुळे पाच वर्षांनंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणूक होणे अपेक्षित होते. कोरोनामुळे महापालिकेची निवडणूक अद्याप होऊ शकलेली नाही. नगरसेवकांची मुदत संपल्याने सध्या महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू झाली आहे. कल्याण-डोंबिवलीत कोरोनाच्या प्रादुर्भावात महापालिकेची निवडणूक मार्च-एप्रिलमध्ये होण्याचे संकेत आहेत. निवडणुकीची तारीख केव्हा जाहीर होईल, याबाबत उत्सुकता लागून राहिली असताना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांनुसार प्रभागरचनेचे काम पूर्ण झाले आहे. त्यात सध्या कोरोना रुग्णांची कमी झालेली संख्या पाहता जानेवारीनंतर निवडणूक होईल, अशीही चर्चा होऊ लागली आहे. प्रभागरचनेला आयोगाने मान्यता दिल्यानंतर त्यावर हरकती आणि सूचना मागवण्यात येतील. नंतर, प्रभागांची आरक्षण सोडत होईल. त्यामुळे या प्रक्रियेला लागणारा कालावधी पाहता निवडणुकीला फेब्रुवारीनंतरच मुहूर्त मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
असे आहेत मतप्रवाह
n दुसरीकडे डिसेंबर आणि जानेवारीमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संभव असल्याने त्यावरच निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असेल, असे जाणकारांचे मत आहे.
n यात दुसरी लाट येईल का? लाट आली तर तिचा प्रभाव किती राहील, यावरही निवडणुकीचा निर्णय निवडणूक आयोगाकडून घेतला जाईल, असाही मतप्रवाह आहे.