डोंबिवली कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी साकारल्या गणेश मूर्ती; जलप्रदूषण टाळण्याचे आवाहन
By अनिकेत घमंडी | Published: August 22, 2022 02:33 PM2022-08-22T14:33:40+5:302022-08-22T14:34:05+5:30
राष्ट्रीय शिक्षण संस्था डोंबिवली स्वामी विवेकानंद विद्यामंदिर गोपाळनगर माध्यमिक शाळेत मातीपासून गणपती मूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.
डोंबिवली: 'जलप्रदूषण दूर करू मातीचे गणपती बनवू', या स्लोगन अंतर्गत जलप्रदूषण टाळण्याचे आवाहन पर्यावरण दक्षता मंचाच्या वतीने विद्यार्थ्यांना करण्यात आले. सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. त्याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे. म्हणून राष्ट्रीय शिक्षण संस्था डोंबिवली स्वामी विवेकानंद विद्यामंदिर गोपाळनगर माध्यमिक शाळेत मातीपासून गणपती मूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.
शाळेचे माजी विद्यार्थी अर्जुन भाबल यांनी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्टचे सदस्य मंदार कुलकर्णी, इनरव्हील क्लबच्या प्रेसिडेंट शुभांगी काळे, सेक्रेटरी नीलम नागडा, खजिनदार लक्ष्मी चैनी , पर्यावरण दक्षता मंचच्या रुपाली शाईवाले,यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण पूरक मातीपासून गणपती मूर्ती मोफत बनविण्याची संधी त्यांनी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली. यावेळी 'या कार्यशाळेत सातवी ते दहावीच्या ऐंशी विद्यार्थ्यांनी लाभ घेतला व अत्यंत सुबक अशा विविध आकारातील गणेश मूर्ती बनविल्या.
गणेशमूर्ती बनविण्याचीअगदी सोपी पद्धत तसेच मूर्तीच्या चेहऱ्यावर जिवंत हावभाव कसे साकारावेत, हे प्रसिद्ध मूर्तिकार गुणेशजी अडवळ, शिल्पकार सोहम अडवळ, भार्गवी अडवळ यांनी विद्यार्थ्यांना सांगितली. त्याचबरोबर या मातीची वैशिष्ट्ये सांगितले.ती वाळल्यावर कुटून पुन्हा पुन्हा वापरता येते.त्यापासून ॲम्बाॅसिंग, म्यूरल, मास्क, पाॅटमेकिंग नागपंचमीसाठी नाग, बैलपोळ्यासाठी बैल, दिवाळीसाठी विविध आकारातील किल्ले बनविता येतील असे सांगितले.
पर्यावरण दक्षता मंचाच्या रुपाली शाईवाले यांनी प्लॅस्टर ऑफ पॅरिस पासून जर प्रदूषण कसे होते हे पटवून दिले. मुलांबरोबर कला शिक्षिका मुख्याध्यापिका विद्या कुलकर्णी यांनी देखील सुबक गणेश मूर्ती बनवली. विद्यार्थ्यासाठी करियरच्या नव्या वाटा यासाठी सातवे पुष्प गुंफले गेले. यासाठी शाळेचे उत्साही क्रीडा शिक्षक लजपत जाधव,कला शिक्षक धांगडा, संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे गणेश पाटील, राम वनघरे, शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शेवटी उत्तम गणेश मूर्ती साकारणाऱ्यां विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. संस्थेच्या प्रोत्साहनामुळे घेतलेल्या अशा नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सर्व स्तरातून खूप खूप कौतुक करण्यात आले.