गणेश मूर्ती विक्रेत्याला लोखंडी रॉडने बेदम मारहाण; डोक्याला दुखापत
By मुरलीधर भवार | Published: August 21, 2023 09:26 PM2023-08-21T21:26:52+5:302023-08-21T21:27:07+5:30
त्याच्या गरोदर पत्नीला देखील केली धक्काबुक्की आणि शिवीगाळ
कल्याण-तुला या जागेवर स्टोल लावायचा असेल तर मला पैसे दे अशी मागणी करत गणेश मूर्ती विक्रेत्याला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना कल्याण खडकपाडा परिसरात काल रात्रीच्या सुमारास घडली.
कल्पेश आर्या असे जखमी विक्रेत्याचे नाव आहे. कल्पेशवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या राजेश केणे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
खडकपाडा परिसरात कल्पेश आर्या हा तरुण आपल्या कुटुंबासह राहतो. गणेश उत्सवासाठी कल्पेश खडकपाडा परिसरात स्टॉल लावून गणेश मुर्त्या विक्री करतो. यंदा देखील त्याने खडकपाडा परिसरात गणेश मूर्ती विक्री करण्याचा स्टॉल लावला आहे. काल रात्री राजेश केणे नावाचा इसम त्याच्या स्टॉलवर आला. तुला इथे स्टॉल लावायचा असेल तर मला पैसे दे असे म्हणत पैशांची मागणी सुरू केली.
कल्पेशने ज्यांची जागा आहे त्यांना पैसे देतो असे सांगत पैसे देण्यास नकार दिला. संतापलेल्या राजेश केणे याने शिवीगाळ करत लोखंडी रॉडने कल्पेशला मारहाण केली. इतकेच नव्हे तर कल्पेशला वाचवण्यासाठी त्याची गरोदर पत्नी पुढे आली. तिला देखील धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. या मारहाणीत कल्पेशला गंभीर दुखापत झाली आहे.