गणपतीक गावाक जाऊक व्हया दिव्याक गाडीक सिग्नल देवा...; प्रवासी संघटनेने निषेध आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 11:16 AM2024-08-15T11:16:57+5:302024-08-15T11:18:34+5:30

दिव्यातील रेल्वे प्रवाशांचे काळ्या फिती लावून निषेध आंदोलन

Ganeshotsav special trains should stop at Diva station demand by Protest movement by travel association | गणपतीक गावाक जाऊक व्हया दिव्याक गाडीक सिग्नल देवा...; प्रवासी संघटनेने निषेध आंदोलन

गणपतीक गावाक जाऊक व्हया दिव्याक गाडीक सिग्नल देवा...; प्रवासी संघटनेने निषेध आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: दिवा स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने दिवा-मुंबई लोकल सुरू करा, गणेशोत्सवालाकोकणात जाणाऱ्या गाड्यांना दिव्यात थांबा द्या या व अन्य मागण्यांकरिता दिवा रेल्वे प्रवासी संघटनेने बुधवारी काळ्या फिती व पांढरे कपडे परिधान करून निषेध आंदोलन केले.

संस्थेचे अध्यक्ष ॲड. आदेश भगत यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले व त्याला प्रवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उपनगरीय रेल्वे मार्गावरील ठाणे व डोंबिवली यानंतर दिवा स्थानक गर्दीचे स्थानक म्हणून ओळखले जाते. गर्दी नियंत्रित करण्यासाठी, अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन दिवा स्थानकाकडे लक्ष देत नाही. सकाळ संध्याकाळी गर्दीच्या वेळेत दिवा स्थानकातून मुंबईच्या दिशेने प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे.

रेल्वे प्रशासनाचे पत्रव्यवहाराकडे दुर्लक्ष

  • दिवा स्थानकाला कोकणाचे नाक असे म्हटले जाते, कोकणात जाणाऱ्या बहुतांश गाड्या मुंबई ठाणे दिवा पनवेल मार्गे कोकणात जातात. परंतु, गणेशोत्सव, शिमगा व मे महिन्याच्या सुटीमध्ये सोडण्यात येणाऱ्या स्पेशल गाड्यांना दिवा स्थानकात थांबा दिला जात नाही. 
  • दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने अनेक वेळा रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप भगत यांनी केला. दोन्ही मागण्यांकरिता सनदशीर मार्गाने आम्ही आंदोलन केले. 
  • रेल्वे प्रशासनाने आमच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. यापुढेही दुर्लक्ष केल्यास भविष्यात हिंसक आंदोलन उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी दिला.
     
  • ...म्हणून आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले

बहुतांश प्रवाशांना सकाळी लोकलमध्ये चढणे मुश्कील असते. त्यामुळे बऱ्याचदा दिव्यातील प्रवाशांना लोकलच्या दरवाजाला लटकून प्रवास करावा लागतो, हात निसटून बऱ्याच प्रवाशांचा जीव गेला आहे. दिवा स्थानकातून कोकण, पनवेल, वसई, मुंबई, कर्जत, कसारा या ठिकाणी प्रवासी प्रवास करत असल्याने या स्थानकांकडे जाणाऱ्या गाड्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी यापूर्वी केली. परंतु रेल्वे प्रशासन दिव्यातील प्रवाशांची मागणी गांभीर्याने घेत नसल्याने आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले.

Web Title: Ganeshotsav special trains should stop at Diva station demand by Protest movement by travel association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.