भेसळयुक्त डिझेल विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश;पाच अटकेत 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 01:26 AM2020-12-18T01:26:31+5:302020-12-18T01:26:46+5:30

कल्याण गुन्हे अन्वेषणची कारवाई : ३० लाख ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त

Gang arrested for selling adulterated diesel; five arrested | भेसळयुक्त डिझेल विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश;पाच अटकेत 

भेसळयुक्त डिझेल विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश;पाच अटकेत 

Next

कल्याण : भेसळयुक्त डिझेलचा साठा आणि विक्री करणाऱ्या टोळीचा कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीसांनी पर्दाफाश केला आहे. आडीवली गावातील एका बांधकाम सुरू असलेल्या गाळ्यात गुरुवारी टाकलेल्या छाप्यात सुमारे १२ हजार लीटर भेसळयुक्त डिझेल जप्त करण्यात आले असून याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. या कारवाईत तब्बल ३० लाख ८६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मानपाडा परिसरातील आडवली गावात काही व्यक्ती बेकायदा मिनीरल टर्पेंटाइन ऑइल व बेस ऑइल यांच्या मिश्रणात रासायनिक रंग मिसळून भेसळयुक्त बायोडिझेलची विक्री करीत आहेत, अशी माहीती कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. त्यानुसार ठाणे शिधावाटप उपनियंत्रक कार्यालयाचे पुरवठा अधिकारी एकनाथ पवार, राजेश पाटणकर, राजेश सोनार यांनी बुधवारी पहाटे छापा टाकला असता त्या ठिकाणी पाच व्यक्ती गाळ्यातील ५ हजार लीटर क्षमतेच्या एकूण ८ टाक्या एकमेकांना पी.यू.सी. पाइपद्वारे जोडून त्यामध्ये मिनिरल टर्पेंटाइन ऑइल, बेस ऑइल व नारंगी रंगाचे रसायन द्रव यांचे मिश्रण करून भेसळयुक्त बायोडिझेल निर्मिती करीत असताना आढळल्या. गाळ्यातील टाक्यातून इलेक्ट्रिक मोटारद्वारे भेसळयुक्त बायोडिझेल टँकर आणि पिकअप वाहनातील टाक्यांमध्ये विक्री करता भरत असताना पोलिसांच्या निदर्शनास आले. भेसळयुक्त डिझेलसह अन्य रसायन आणि दोन्ही वाहने जप्त करण्यात आली आहेत.

आरोपींना २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी 
 पवन यादव, कृष्णा शुक्ला, रोहन शेलार, पंकज सिंग, विपुल वाघमारे ही या प्रकरणी अटक केलेल्या पाच आरोपींची नावे आहेत. त्यांना गुरुवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक भूषण दायमा, पोलीस उपनिरीक्षक नितीन मुदगून, मारुती दिघे, शरद पंजे, पोलीस हवालदार दत्ताराम भोसले, विलास मालशेटे, सचिन साळवी यांसह अन्य पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.

बारा हजार लीटर भेसळयुक्त तेल जप्त 
 आडीवली गावात बांधकाम सुरू असलेल्या गाळ्यात टाकलेल्या छाप्यात १२ हजार लीटर भेसळयुक्त डिझेल जप्त करण्यात आले.

Web Title: Gang arrested for selling adulterated diesel; five arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.