दलालांच्या भूलथापांना बळी न पडता आपल्या मेहनतीच्या जोरावर पोलीस व्हा: आमदार गणपत गायकवाड
By मुरलीधर भवार | Published: October 10, 2022 02:25 PM2022-10-10T14:25:55+5:302022-10-10T14:27:08+5:30
कल्याण पूर्वेतील ग्रामीण भागात मोफत पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र सुरु; आमदार गणपत गायकवाड यांचा पुढाकार
कल्याण : दलालांच्या भूलथापांना बळी न पडता आपल्या मेहनतीच्या जोरावर पोलीस व्हा असे आवाहन कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस भरती प्रशिक्षणार्थीना केले. आमदार गणपत गायकवाड यांच्या वतीने श्रीमलंग गड पायथ्याशी नेवाळी गाव येथे विनामूल्य पोलीस भरती प्रशिक्षण केंद्राचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला 200 युवक युवतींनी सहभाग घेतला. यावेळी आमदारांनी देखील या विद्यार्थ्यासह ग्राउंडमध्ये धावत फेरी पूर्ण केली.
महाराष्ट्रात लवकरच २० हजार जागांसाठी पोलीस पदांची मेगा भरती होणार असल्याने कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातील जास्तीत जास्त युवक-युवतींचा या पोलिस भरती प्रक्रिया मध्ये समावेश व्हावा या हेतून हे केंद्र सुरु करण्यात आले आहे. पोलीस भरती म्हटल्यानंतर बऱ्याच युवक युतींना या संदर्भात पुरेशी माहिती नसते तसेच मैदानी प्रशिक्षण याबाबत कल्पना नसते त्या अनुषंगानेच प्रशिक्षण वर्गामध्ये युवक युवतींना पूर्ण प्रशिक्षण आणि लेखी परीक्षा साठी मार्गदर्शन करून त्यांची सर्व तयारी करून पोलीस भरतीसाठी त्यांना पात्र होण्यासाठी पूर्ण सहकार्य आणि प्रशिक्षण दिले जाईल. या विनामूल्य पोलीस भरती प्रशिक्षण वर्गामध्ये अनेक तज्ञ प्रशिक्षक आणि अनुभवी शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभणार असल्याचे आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितले.
तर अनेकवेळा पोलीस भरती दरम्यान काही दलाल लोकं या इच्छुकांकडून भरती करून देण्यासाठी पैसे घेत असतात. मात्र आताचे सरकार कोणताही भ्रष्टाचार करत नाही आणि करणार नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना ५ वर्षात कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप त्यांच्यावर झाला नाही. फडणवीस यांनी त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये अथवा इतर कोणत्याही बदल्यांमध्ये भ्रष्टाचार केला नाही. त्यामुळे या पोलीस भरतीत कधीच भ्रष्टाचार होणार नाही. मात्र काही भोंदू लोकं १००, २०० लोकांचे पैसे घेऊन १०, २० लोकं भरती झाल्यावर आपण सेटिंग लावून भरती करून दिलं असं खोटं सांगतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा दलालांच्या भूलथापांना बळी न पडता शारीरिक आणि बौद्धिक मेहनतीच्या जोरावर पोलीस व्हावे असे आवाहन आमदार गणपत गायकवाड यांनी केले.
या उद्घाटन प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे मलंगगड विभाग अध्यक्ष राजेंद्र वारे, जि.प. सदस्य श्याम पाटील, कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे, जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, ओबीसी मोर्चा अध्यक्ष निलेश म्हात्रे, युवा अध्यक्ष समीर भंडारी, जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ मढवी, समाजसेवक प्रकाश दुतकर, ज्येष्ठ नेते गोटीराम पाटील, नेवाळीगाव सरपंच पूजा जाधव तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"