गायकवाड समर्थकांच्या अडचणीत झाली वाढ; पोलिस करणार प्रतिबंधात्मक कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 09:23 AM2024-02-20T09:23:54+5:302024-02-20T09:24:29+5:30
गोळीबार प्रकरणानंतर तुरुंगात असलेल्या भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थकांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.
कल्याण : गोळीबार प्रकरणानंतर तुरुंगात असलेल्या भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थकांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. गोळीबार आधी रस्त्याच्या भूमिपूजन दरम्यान एका शाळेतील पालकांचा आणि भाजप कार्यकर्त्यांचा वाद झाला होता. याची दखल घेत आमदार गायकवाड यांचे समर्थक संदीप तांबे व अन्य दोन जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. कोळसेवाडी पोलिसांकडून तांबे याला तशी सूचना देण्यात आली आहे.
कल्याण पूर्वेतील नूतन विद्यामंदिर शाळेच्या समोरच्या जागेत रस्ते विकासाच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे आयाेजन केले होते. हा रस्ता गायकवाड यांच्या आमदार निधीतून करण्यात येत असल्याने त्याठिकाणी गायकवाड पोहचले असता स्थानिकांनी त्यांच्या भूमिपूजनास विरोध करत ही जागा चर्चची आहे, असे सांगण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्ते आणि नागरिक यांच्यात वाद होऊन हाणामारी झाली होती.
आमदार गायकवाडांसह पाच जण कोठडीत
द्वारली येथील जागेच्या वादातून हिललाइन पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. याप्रकरणात आमदार गायकवाड यांच्यासह पाचजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
हाणामारी प्रकरणी नोंद
हाणामारी प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी एनसी दाखल केली होती. याच प्रकरणात कोळसेवाडी पोलिसांनी संदीप तांबे याच्यासह अन्य दोन जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.