केडीएमसीच्या बारावे घनकचरा कचरा प्रकल्पातील कचऱ्याला आग
By मुरलीधर भवार | Published: April 5, 2023 03:47 PM2023-04-05T15:47:22+5:302023-04-05T15:47:30+5:30
बारावे कचरा प्रकल्पात सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. आज दुपारी कचऱ्याला आग लागल्याने आगीने लगेच राैद्र रुप धारण केले.
कल्याण-शहरातील पश्चिम भागातील कल्याण डाेंबिवली महापालिकेच्या बारावे घनकचरा प्रकल्पातील कचऱ्याला आज दुपारी आग लागल्याने या परिसरात धुराचे साम्राज्य पसरले हाेते. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट हाेऊ शकले नाही. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. ३ तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यास अग्नीशमन दलाला यश आले.
बारावे कचरा प्रकल्पात सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. आज दुपारी कचऱ्याला आग लागल्याने आगीने लगेच राैद्र रुप धारण केले. आगीमुळे परिसरात धूर पसरला हाेता. हा धूर आसपास राहणाऱ्या नागरीकांच्या नाका ताेंडात गेल्याने नागरीकांना त्रास झाला. आग लागल्याची माहिती मिळताच आग विझविण्यासाठी घटना स्थळी अग्नीशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या.
१० मार्चला रात्रीच्या सुमारास बारावे कचरा प्रकल्पास आग लागल्याची घटना घडली हाेती. ती आगही माेठी हाेती. आगीचा धूर ११ मार्चपर्यंत परिसरात धुमसत हाेता. त्यानंतर पुन्हा आज प्रकल्पातील कचऱ्याने पेट घेतला. आग कशामुळे लागली याचे कारण स्पष्ट हाेत नसले तरी आग लागली की लावली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बारावे कचरा प्रकल्पात कचऱ्यापासून खत तयार करण्याची प्रक्रिया केली जात असली तरी त्याठिकाणी प्रकल्पाच्या क्षमतेपक्षा जास्त कचरा साठविला जाताे. त्यामुळे त्याठिकाणी कचऱ्यावर याेग्य प्रकारे प्रक्रिया केली जात नाही. प्रकल्पावर ताण येत आहे. उन्हाळ्यात साचलेल्या कचऱ्यात मिथेन वायू तयार हाेऊ आपाेआप आग लागण्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहे. या कारणामुळेही आग लागली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.