कचरा गाडी रस्त्यात फसली, कचऱ्याच्या गाडीमुळे या परिसरात दुर्गंधी पसरली
By अनिकेत घमंडी | Published: June 22, 2024 12:08 PM2024-06-22T12:08:26+5:302024-06-22T12:09:35+5:30
या रस्त्यावर यापूर्वी नवीन भूमिगत सांडपाणी वाहिन्या टाकण्यासाठी हा रस्ता एमआयडीसी ठेकेदाराकडून खोदण्यात आला होता. परंतु भूमिगत सांडपाणी वाहिन्यांचे काम झाल्यावर त्यावर निकृष्ट काँक्रिट भराव हा ठेकेदार कडून टाकण्यात आला होता.
डोंबिवली: एमआयडीसी निवासी मधील धर्मवीर आनंद दिघे उद्यान समोर शनिवारी कचरा गोळा करण्यासाठी आलेली केडीएमसीची कचरा गाडीचे चाक एका बाजूला रस्त्यात फसल्याने तेथील आजूबाजूच्या रहिवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागला. काही दिवसांपूर्वीच येथील हा अंदाजे शंभर मीटरचा रस्ता बनविण्यात आला होता.
या रस्त्यावर यापूर्वी नवीन भूमिगत सांडपाणी वाहिन्या टाकण्यासाठी हा रस्ता एमआयडीसी ठेकेदाराकडून खोदण्यात आला होता. परंतु भूमिगत सांडपाणी वाहिन्यांचे काम झाल्यावर त्यावर निकृष्ट काँक्रिट भराव हा ठेकेदार कडून टाकण्यात आला होता. सदर हा रस्ता खराब झाल्याने, येथील काही जागरूक रहिवाशांच्या विनंती नुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून डांबरी रस्ता बनविला गेला पण तो अरुंद आणि त्यावर सिलकोट मारला नसल्याने हा रस्ता येणाऱ्या पावसाळ्यात पुन्हा खड्डे/चिखलमय होणार आहे. खरेतर सदर रस्ता केडीएमसी/एमआयडीसी कडून बनविला गेला पाहिजे होता.
सदर कचऱ्याची गाडी अंदाजे एक तास अडकून राहिल्याने या परिसरातील कचरा गोळा करण्याचे काम काही काळ अपूर्ण राहिले. तसेच या कचऱ्याच्या गाडीमुळे या परिसरात दुर्गंधी पसरली होती. सागर पाटील यांनी याबाबतीत प्रशासनाचे लक्ष वेधले असून केडीएमसी/एमआयडीसी यांनी निवासी मधील काँक्रीटीकरण नाही झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती त्वरित सुरू करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.