मस्तच! कचऱ्याच्या जागी फुलणार नंदनवन; कल्याणच्या आधारवाडी डम्पिंगवर होणार जबरदस्त गार्डन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 08:12 PM2021-05-26T20:12:56+5:302021-05-26T20:13:39+5:30
कल्याणमधील आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड आता बंद झाल्यानं नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण परिसरातील नागरिकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे.
कल्याणमधील आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड आता बंद झाल्यानं नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण परिसरातील नागरिकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. ज्या ठिकाणी गेली अनेक वर्ष कचऱ्याचं साम्राज्य होतं. जिथं चुकूनही कुणी फिरकायचं नाही आता त्याठिकाणी पालिका सुंदर उद्यानाची निर्मिती करणार आहे.
आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड केवळ बंद केल्याची घोषणा कल्याण-डोंबिवली महापालिकेने केलेली नाही. तर त्याठिकाणी येत्या काळात सुंदर असं गार्डन तयार केलं जाणार असल्याची माहिती खुद्द पालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे. काल २५ मेपासून आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड कायमस्वरुपी बंद करण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर आज विजय सूर्यवंशी यांनी या जागेची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्यासह अधिकारी ऑगस्टीन घुटे, जनसंपर्क अधिकारी माधवी फोफळे उपस्थित होते.
"आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड बंद झालं ही खूप मोठी आणि चांगली बातमी आहे. आता या जागेवरील सगळा कचरा बायोमायनिंग पद्धतीने हटविला जाईल. या जागेवर उद्यान, सायकलिंग ट्रॅक आणि जॉगिंग ट्रॅक विकसित केला जाणार आहे", अशी घोषणा सूर्यवंशी यांनी केली. यासोबतच परिसरात बिल्डींग परवानगी देताना कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या अटी त्यामध्ये अंतर्भूत असतात, परंतु या अटी पालन न केल्यास संबंधित विकासकांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा देखील केडीएमसी आयुक्तांनी यावेळी दिला.
आधारवाडी येथील डम्पिंग ग्राउंड बंद केल्यामुळे उंबर्डे आणि बारावे येथे कचरा प्रक्रिया करण्यात येईल . यापूर्वी कचऱ्याचे वर्गीकरण व्यवस्थित होत नव्हते,आता ओला कचरा हा आता बायोगॅस व कंपोस्टिंग साठी पाठवला जातो आणि सुका कचरा उचलण्यासाठी या एजन्सी पुढे आलेल्या आहेत आणि त्यांचेकडून महानगरपालिकला रॉयल्टी देखील मिळते अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.