निरीक्षणगृहात मुलीचा छळ; पडली आजारी, सुटकेसाठी दीड लाख मागितल्याचा आरोप

By सदानंद नाईक | Updated: March 6, 2025 09:43 IST2025-03-06T09:42:28+5:302025-03-06T09:43:10+5:30

बालकल्याण समितीच्या एका महिला सदस्याने दीड लाख रुपये मागितल्याचा आरोप मुलीच्या आई-वडिलांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

girl tortured in observation house fell ill accused of demanding rs 1 lakh 50 thousand for release | निरीक्षणगृहात मुलीचा छळ; पडली आजारी, सुटकेसाठी दीड लाख मागितल्याचा आरोप

निरीक्षणगृहात मुलीचा छळ; पडली आजारी, सुटकेसाठी दीड लाख मागितल्याचा आरोप

सदानंद नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, उल्हासनगर : बालविवाह रोखून बालविकास समितीने मुलीची रवानगी मुलींच्या शासकीय निरीक्षणगृहात केली. निरीक्षणगृहात तिचा छळ झाल्याने ती आजारी पडली. तिच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलीच्या आई-वडिलांनी माफीनामा देत मुलीच्या सुटकेची मागणी केली असता, बालकल्याण समितीच्या एका महिला सदस्याने दीड लाख रुपये मागितल्याचा आरोप मुलीच्या आई-वडिलांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

२४ फेब्रुवारी रोजी बालविवाह रोखण्यात महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी, पोलिसांना यश आले. हिललाइन पोलिसांनी याप्रकरणी १० जणांवर गुन्हा दाखल केला. मुलीचे समुपदेशन व इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत महिला व बाल विकास समितीच्या अध्यक्षा राणी भैसाणे यांनी मुलीची रवानगी शासकीय निरीक्षणगृहात केली. निरीक्षणगृहात मुलीचे समुपदेशन होण्याऐवजी निरीक्षणगृहातील इतर मुलींनी तिचा छळ केला. तिला भांडी व कपडे धुणे, पाणी भरण्यास सांगितले. कामाच्या ताणामुळे मंगळवारी मुलीची तब्येत बिघडल्याचा फोन आई-वडिलांना आल्यावर त्यांनी तिला रुग्णालयात भरती केले. तिने निरीक्षणगृहात छळ झाल्याचे सांगितले.  

मुलीला मारहाण ?

मुलींच्या शासकीय निरीक्षणगृहात १५ पेक्षा जास्त मुली आहेत. त्यांच्यात भांडणे होतात. या मुलीलाही मारहाण व छळ झाला असावा, असे हाणामारीचे प्रकार सुधारगृहात होतात. - व्ही. व्ही. सिल्व्हर, अधीक्षिका, मुलींचे निरीक्षणगृह

बाल समितीवर राजकीय दबाव 

बालविवाह रोखलेल्या मुलीचे समुपदेशन व्हावे, ती सुरक्षित राहावी, म्हणून तिला निरीक्षणगृहात ठेवले. तिच्या सुटकेची प्रक्रिया सुरू होती. मात्र, मुलीच्या आई-वडिलांनी बाल समितीवर राजकीय दबाव आणून आमची सुरक्षा धोक्यात आणली. दीड लाख मागितल्याचा आरोप खोटा आहे. त्यांनी पुरावा सादर करावा. - राणी भैसाणे, अध्यक्षा, ठाणे महिला व बालविकास समिती

 

Web Title: girl tortured in observation house fell ill accused of demanding rs 1 lakh 50 thousand for release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.