अल्पवयीन मुली डोंबिवलीत असुरक्षितच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 10:33 AM2021-09-28T10:33:35+5:302021-09-28T10:33:59+5:30
एकीचा विनयभंग, तर दुसरीचे अपहरण
डोंबिवली : डोंबिवलीत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका शिकवणी घेणाऱ्या १५ वर्षीय मुलीचा अन्य मुलीच्या पालकाने विनयभंग केला, तर इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीतून एका १३ वर्षीय मुलीस फूस लावून तिचे अपहरण केल्याची घटना घडली आहे. या दोन्ही घटनांमधील आरोपींना अटक केली आहे.
डोंबिवली पश्चिमेत राहणाऱ्या एका १३ वर्षीय मुलीशी भिवंडीत राहणाऱ्या एका तरुणाने इन्स्टाग्रामवर ओळख केली. पुढे चॅटिंग करता करता तिच्याशी त्याची मैत्री झाली. अखेर तिला विश्वासात घेऊन तिला फूस लावून तिचे अपहरण केले. दरम्यान याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच तपास करून या गुन्ह्यातील आरोपीस अटक करून अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका करून तिला कुटुंबाच्या हवाली केले. क्लासला जाते, असे सांगून ती सोमवारी घराबाहेर पडली होती. रात्रीपर्यंत ती घरी न आल्याने तिचा शोध घेतला. पण कुठेच थांगपत्ता न लागला नाही. आरोपीला ठाणे येथून अटक केली आहे. त्याने तिला त्याच्या भिवंडी येथील राहत्या घरात डांबून ठेवले होते.
भाजप कार्यकर्ता जेरबंद
डोंबिवली पूर्वेतील शिकवणी घेणाऱ्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा भाजप कार्यकर्त्याने विनयभंग केल्याची घटना रविवारी रात्री घडली. अल्पवयीन मुलीकडे शिकायला येणाऱ्या एका मुलीचा आरोपी हा बाप आहे. त्या मुलीला घरी सोडण्यासाठी गेला असता पीडित मुलीचा विनयभंग केला. टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.