बीएसयूपी घरांचा ताबा फेब्रुवारीअखेर द्या; केडीएमसी आयुक्तांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 12:47 AM2020-12-18T00:47:05+5:302020-12-18T00:47:13+5:30
उंबर्डे येथील प्रकल्पाची केली पाहणी
कल्याण : केंद्र सरकारच्या बीएसयूपी प्रकल्पांतर्गत शहरी गरिबांसाठी कल्याण पश्चिमेतील उंबर्डे येथे उभारण्यात येणाऱ्या दीड हजारपैकी ७०० घरांचा ताबा फेब्रुवारीअखेरपर्यंत द्यावा, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बुधवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
बुधवारी त्यांनी विविध प्रकल्पांच्या पाहणीअंतर्गत उंबर्डे व बारावे येथील बीएसयूपी प्रकल्पास भेट दिली. याप्रसंगी महापालिकेच्या गृहनिर्माण प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील जोशी, जगदीश कोरे, भालचंद्र नेमाडे, परिवन व्यवस्थापक मिलिंद धाट उपस्थित होते. आयुक्तांनी सांगितले की, उंबर्डे येथे बीएसयूपी प्रकल्पांतर्गत दीड हजार घरे तयार होत आहेत. त्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यापैकी ७०० घरांचे काम फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्ण करून त्याचा ताबा लाभार्थींना द्यावा. त्याचबरोबर बारावे येथे एक हजार २४३ घरे तयार होत आहेत. त्याचे सिव्हिल वर्क पूर्ण झाले आहे.
सीएनजी पंपास निधीची कमतरता नाही
वालधुनी नदीच्या संरक्षक भिंतीसह बांधकाम सुरू असलेल्या पुलाची पाहणी करून तो फेब्रुवारीअखेर पूर्ण करण्यास सांगितले. पावसाळ्यात पूरपरिस्थिती उद्भवल्यास संरक्षक भिंत नसल्याने पाणी आगारात शिरते, याकडे लक्ष वेधले. प्रस्तावित सीएनसी पंपाच्या जागेची पाहणीही आयुक्तांनी केली. निधीची कमतरता असल्याने सगळी कामे करणे शक्य नसल्याने अत्यावश्यक कामांचे प्रस्ताव सादर केल्यास त्यास मान्यता दिली जाईल, अशी हमी दिली.
विद्युतीकरणाचे काम मार्चपर्यंत
बीएसयुपीच्या घरातील विद्युतीकरण व लिफ्टचे काम मार्चअखेर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदारांना आयुक्तांनी केल्या. यानंतर त्यांनी गणेश घाट येथील परिवहन कार्यशाळेस भेट देऊन बस स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वॉशिंग रॅम्पची पाहणी केली. कोरोना काळात बस दररोज स्वच्छ झाल्या पाहिजेत याची काळजी घ्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या.