सोन्याच्या अंगठ्या, सोनसाखळ्या असलेली बॅग प्रवाशाला परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 12:29 AM2020-11-28T00:29:13+5:302020-11-28T00:29:24+5:30
रेल्वे पोलिसांची कामगिरी : दिवा-अंबरनाथ मार्गावरील घटना
डाेंबिवली : दिवा-डोंबिवली स्थानकांदरम्यान मंगळवारी आरपीएफ हेल्पलाइनवर उपनगरीय ट्रेनमध्ये सोन्याच्या अंगठ्या, सोनसाखळी, बँकेची कागदपत्रे, रोख पैसे असलेली बॅग एक प्रवासी विसरल्याचा संदेश मिळाला. संदेश मिळाला, त्यावेळी ती गाडी अंबरनाथ सायडिंगला जाण्यासाठी निघाली होती. त्यानुसार, कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ जवानांनी प्रसंगावधान राखून प्रवाशाला त्याचा ऐवज असलेली बॅग शोधून परत केली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना जनसंपर्क अधिकारी ए.के. सिंग यांनी सांगितले की, दिवा येथील रहिवासी संदीपकुमार सिंह (रा. अलंकार अपार्टमेंट, आगासन रोड, दिवा) हा कुर्ला येथून दिवा येथे जात असताना प्रवासात त्याची बॅग लोकलमध्येच विसरला. त्या बॅगमध्ये तीन सोन्याच्या अंगठ्या, एक सोनसाखळी, एक जोडी कानांतील रिंग, घराचे करारनामा कागद, बँक चेकबुक, अन्य कागदपत्रे आणि ५५० रुपयांची रोख रक्कम असा एकूण सुमारे एक लाख १० हजार ५५० रुपयांचा ऐवज होता. याबाबत संदीपकुमार यांनी आभार मानले आहेत.
हेल्पलाइनवर दिला संदेश
आरपीएफ पोलीस चंदर ठाकूर यांनी संबंधित लोकलची माहिती घेऊन हेल्पलाइनच्या १८२ या क्रमांकावर संदेश दिला. ती माहिती मिळताच पोलीस राहुल निकम, आणखी एक कॉन्स्टेबल यांनी गाडीमध्ये शोध घेतला असता ती बॅग मिळाली. त्यांनी बॅग आरपीएफ पोस्ट अंबरनाथ येथे आणली असता, पडताळणीनंतर प्रवाशाच्या ताब्यात देण्यात आल्याचे सिंग यांनी गुरुवारी सांगितले.