सरकारचा फ्यूज उडाला आहे; वीजबिलांच्या वसुलीवरून चित्रा वाघ यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 12:48 AM2021-02-01T00:48:55+5:302021-02-01T00:49:53+5:30
Maharashtra Government News : नागरिकांनी बिले भरली नसल्याने सरकारने वीज कनेक्शन तोडण्याची तयारी केली आहे. त्यामुळे सरकारचा फ्यूजच उडाला आहे
कल्याण - नागरिकांना वीजबिलात सवलत देण्याची घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली होती. मात्र आता नागरिकांनी बिले भरली नसल्याने सरकारने वीज कनेक्शन तोडण्याची तयारी केली आहे. त्यामुळे सरकारचा फ्यूजच उडाला आहे, अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी कल्याणमध्ये केली.
केडीएमसीचे माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या वतीने आडिवली-ढोकळी परिसरात रविवारी हळदी-कुंकू कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला वाघ यांनी उपस्थिती लावली. सर्वसामान्य नागरिकांना दिलेली आश्वासने पाळण्यात राज्य सरकारला अपयश आले. नागरिक सरकारला योग्य धडा शिकवणार असल्याचेही वाघ म्हणाल्या. मध्य रेल्वेवर उद्यापासून नागरिकांना प्रवासासाठी लोकलची सेवा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला. ही सेवा सर्वसामान्यांना फायदेशीर नसल्याचे विधानही त्यांनी केले. रेल्वे सुरू होण्याने नोकरदारालाही याचा फायदा होणार नसल्याकडे वाघ यांनी लक्ष वेधले. हळदीकुंकूला मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थिती लावली होती. पाटील यांनी बचत गटांच्या नोंदणी केल्या असून या बचतगटांद्वारे योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करत पाटील आमदार झाले तर आनंद होईल, असेही त्या यावेळी म्हणाल्या.