कल्याण पूर्वेत साकारणार भव्य क्रिडा संकुल; खासदारांच्या हस्ते पार पडले भूमिपूजन
By मुरलीधर भवार | Published: March 11, 2024 01:59 PM2024-03-11T13:59:09+5:302024-03-11T13:59:18+5:30
२ एकर जागेवर हे क्रिडा संकुल उभे केले जाईल. खेळाडूंना एक हक्काचे ठिकाण मिळणार आहे.
कल्याण- कल्याणमधील विजयनगर येथील जगन्नाथ शिंदे क्रीडा संकुलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. हा प्रकल्प विजयनगर हौसिंग फेडरेशनच्या जागेवर उभा राहणार आहे. ठाणे जिल्ह्यात सहकार तत्वातून प्रथमच अशा प्रकारे क्रिडा संकुलाचा विकास लाेकसहभातून केला जात आहे. त्यामुळे हा पहिलाच प्रकल्प आहे.
प्रसंगी माजी आमदार जगन्नाथ शिंदे, सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदूराव, आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड,
माजी नगरसेवक निलेश शिंदे, माजी नगरसेविका माधूरी काळे, प्रशांत काळे, विजय नगर हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष पी. डी. चौधरी,उद्योजक मनोज राय आदी मान्यवर उपस्थित होते.
विजयनगर हौसिंग फेडरेशनची जागा क्रिडा संकुलास देण्याकरीता माजी नगरसेविका माधूरी काळे आणि शिवसेना पदाधिकारी प्रशांत काळे यांनी विशेष प्रयत्न आणि पाठपुरावा केल्याने हा प्रकल्प प्रत्यक्षात येणार आहे. २ एकर जागेवर हे क्रिडा संकुल उभे केले जाईल. खेळाडूंना एक हक्काचे ठिकाण मिळणार आहे. या क्रीडासंकुलामध्ये क्रिकेट, फुटबॉल, हॉलीबॉल, बास्केटबॉल, लॉन टेनिस, बॅडमिंटनसह विविध प्रकारच्या आंतरराष्ट्रीय दर्जाची कोर्ट तसेच जॉगींग ट्रॅक व इनडोअर गेमकरिता सर्व सुविधायुक्त ऑडिटोरियम हॉल, स्विमिंग पुल, अद्यायावत व्यायामशाळा, सभासदांकरिता सभागृह लॉन आदी इतर सुविधा उपलब्ध असतील.
या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनात शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. या क्रीडा संकुलाच्या निमित्ताने देशात एक नवा अध्याय सुरू होतोय. मोबाईलमध्ये रमलेल्या मुलांना मोबाईलच्या वेडातून बाहेर काढण्यासाठी हे संकुल महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.