पश्चिम बंगालचा ग्रँड मास्टर मित्रबा गुहा ठरला आमदार चषक राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेचा विजेता
By मुरलीधर भवार | Published: March 4, 2024 11:37 AM2024-03-04T11:37:35+5:302024-03-04T11:37:56+5:30
आमदार विश्वनाथ भोईर आणि कल्याण तालुका बुद्धीबळ संस्थेतर्फे यांच्यातर्फे आयोजन
कल्याण : कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने आणि कल्याण तालुका बुद्धीबळ संस्थेच्या माध्यमातून आयोजित २ ऱ्या आमदार चषक राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेमध्ये पश्चिम बंगालच्या मित्रबा गुहाने सर्वाधिक अशा ९ गुणांची कमाई करत विजेतेपदावर आपलं नाव कोरले.
कल्याणातील नवरंग बँकवेट हॉलमध्ये झालेल्या या तब्बल साडेसहाशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. ज्यामध्ये कल्याण डोंबिवली परिसरातील २०० खेळाडूंचा समावेश होता. कल्याण तालुका बुद्धीबळ संस्थेमार्फत या स्पर्धेचे अत्यंत सुंदरपणे नियोजन करण्यात आले होते.
स्पर्धेतील पहिला क्रमांक पश्चिम बंगालच्या मित्रबा गुहाने, साडेआठ गुणांच्या कमाईसह चेन्नई आय सी एफ च्या लक्ष्मण आर. आर. यांनी दुसरा तर ८ गुणांच्या कमाईसह पश्चिम बंगालच्याच कौस्तूव कुंडुने तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
कल्याण तालुका बुद्धीबळ संस्थेमार्फत या स्पर्धेचे अत्यंत सुंदरपणे नियोजन करण्यात आले होते. कल्याणातील होतकरू बुद्धीबळपटूना एक प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून गेल्या वर्षीपासून या बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. तर कल्याणातील ही अशी एकमेव बुद्धीबळ स्पर्धा ठरली ज्यामध्ये एकाच वेळी देशातील १७ ग्रँड मास्टर आणि इंटरनॅशनल मास्टर खेळाडू सहभागी झाले होते. ५ वर्षांच्या चिमुरड्यापासून ते ७६ वर्षांच्या आजोबांपर्यंत वयाच्या खेळाडूंनी यामध्ये सहभाग घेतला होता अशी माहिती कल्याण तालुका बुद्धीबळ संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी दिली.