पहिल्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेची पंचविशी!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 01:41 PM2023-03-20T13:41:11+5:302023-03-20T13:41:43+5:30
डोंबिवली पूर्वेला १९९८ मध्ये मदन ठाकरे चौकात ३१ डिसेंबर साजरा करण्यात आला.
- प्रवीण दुधे,
(कार्यवाह, गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली)
गेल्या काही वर्षांत ३१ डिसेंबर, व्हॅलेंटाइन डेचे वाढते प्रस्थ पाहता हिंदू संस्कृतीवर पाश्चिमात्य संस्कृतीचे आक्रमण होत आहे. या पाश्चिमात्य संस्कृतीच्या पगड्याला विरोध न करता एखादा पर्याय द्यावा, या उदात्त हेतूने श्री गणेश मंदिर संस्थानाने गुढी पाडव्याचे औचित्य साधत हिंदू नववर्षानिमित्त लोकसहभागातून स्वागतयात्रेची संकल्पना उदयास आणली. केवळ मिरवणूक काढून नववर्षाचे स्वागत करणे हा स्वागतयात्रेचा मूळ उद्देश न राहता त्यातून संस्कृतीचे जतन करण्याबरोबरच विविध उपक्रम आणि सामाजिक संदेशाद्वारे बांधीलकी जपली आहे. १९९९ ला प्रारंभ झालेल्या या ‘गावकीच्या उत्सवाचे’ यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे.
डोंबिवली पूर्वेला १९९८ मध्ये मदन ठाकरे चौकात ३१ डिसेंबर साजरा करण्यात आला. डोंबिवलीकर प्रेमी आणि सामाजिक जाण असलेल्यांनी तो प्रकार पाहिला. ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर, मधुकर चक्रदेव आणि सुरेंद्र वाजपेयी यांच्यापर्यंत ही घटना पोहोचली. ३१ डिसेंबरचे प्रस्थ वाढत गेले तर शहराचे चित्र पालटू शकते, अशी भीती त्यावेळी व्यक्त झाली. दत्तनगरमध्ये बैठक झाली. ३१ डिसेंबर या पाश्चिमात्य संस्कृतीचे आक्रमण पाहता वेगळा पर्याय देणे आवश्यक असल्याने ‘हिंदू नववर्षाची स्वागतयात्रा’ ही संकल्पना सुरू करण्याचा विचार मांडण्यात आला. उपक्रम सर्वसमावेशक असला पाहिजे, यात राजकीय तसेच कोणत्याही ज्ञातिभावना येऊ नये याकडेही लक्ष वेधले गेले. उपक्रमाचे प्रतिनिधित्व श्री गणेश मंदिर संस्थानने करावे, असाही निर्णय झाला.
दांडगा लोकसंपर्क असलेले आबासाहेब पटवारी हे त्यावेळी श्री गणेश मंदिर संस्थानचे अध्यक्ष होते. अन्य विश्वस्तांची बैठक झाली आणि स्वागतयात्रेच्या पूर्वतयारीला सुरुवात झाली. शहरातील सर्व धार्मिक संस्थांना, सांप्रदायांनाही आवाहन पत्रके वाटण्यात आली. सर्वसामान्य नागरिकांपर्यंत ही संकल्पना पोहोचावी म्हणून शहरातील शैक्षणिक संस्थांची मदत घेण्यात आली. बालगोपाळांना आकर्षण वाटावे म्हणून नववर्षाच्या पूर्वसंध्येला आतषबाजी आयोजित करण्यात आली. हजारो नागरिकांच्या सहभागाने वेगवेगळ्या विषयांवरील चित्ररथांनी, कलापथके आणि मेळ्यांनी निघणारी नववर्ष स्वागत शोभायात्रा आजही शिस्तबद्ध पद्धतीने होत आहे.
गेल्या २४ वर्षांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, दिग्दर्शक राजदत्त, माजी सरसंघचालक के. सुदर्शन, पुणे पीठाचे स्वामी स्वरूपानंद, साध्वी ऋतुंबरा, अभिनेते मोहन जोशी, आयपीएस अधिकारी वाय. सी. पवार, दा. कृ. सोमण यांच्यासह इतर महनीय व्यक्तींनी उपस्थिती लावली आहे. स्वागतयात्रेचे यंदाचे वर्ष रौप्यमहोत्सवी आहे. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी आजवरच्या सर्व विश्वस्तांचे मोठे योगदान लाभले आहे.