हाजीमलंगरोड लगतच्या कुसवलीत चक्क गुटखा बनविण्याचा कारखाना; १७ लाखांचा मुद्देमाल जप्त

By प्रशांत माने | Published: February 29, 2024 08:39 PM2024-02-29T20:39:17+5:302024-02-29T20:39:37+5:30

गुटखा वाहतूकीची माहिती मिळाली आणि सापळ्यात अडकले

Gutkha making factory at Kuswali near Hajimalang Road; 17 lakhs worth seized | हाजीमलंगरोड लगतच्या कुसवलीत चक्क गुटखा बनविण्याचा कारखाना; १७ लाखांचा मुद्देमाल जप्त

हाजीमलंगरोड लगतच्या कुसवलीत चक्क गुटखा बनविण्याचा कारखाना; १७ लाखांचा मुद्देमाल जप्त

कल्याण: राज्यात गुटखा विक्रीला परवानगी नसताना गुटख्याची विक्री-खरेदी बिनदिक्कतपणे सुरू असल्याचे यंत्रणांच्या कारवाईतून वारंवार समोर आले आहे. आजवर गुटखा परराज्यातून छुप्या पध्दतीने आणला जात होता परंतू आता तर हाजीमलंगरोड लगतच्या कुसवलीत चक्क गुटखा बनविण्याच्या कारखाना सुरू असल्याचे कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या धाडीतून उघडकीस आले आहे. तिघांना बेड्या ठोकत पावणे आठ लाखांच्या गुटख्यासह दोन मशीन, कच्चा माल आणि एक गाडी असा एकुण १७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

विराज सिताराम आलीमकर (वय २४) रा. शिळफाटा, मोहम्मद उमर अब्दुल रेहमान ( वय ३५) आणि मोहम्मद तारीक आलीकादर खान (वय २१) दोघे रा. मुंब्रा शिळ रोड अशी अटक आरोपींची नावे आहेत. आणखीन दोघांचा शोध सुरू असून ज्या शेतजमिनीत कारखाना थाटला होता त्या जमिन मालकाचाही शोध सुरू असल्याची माहीती ठाणे शहर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली. विराज हा गुटखा विक्रीचा धंदा करतो तर अन्य दोघेजण कारागीर म्हणून कारखान्यात काम करायचे. गुटखा बनविण्यासाठी कच्चा माल सुरत येथून यायचा. कारखान्यावर छापा मारला असता त्याठिकाणी दोन मोठया मशिन व सुगंधीयुक्त सुपारी, विमल पान मसाला, राजनिवास पानमसाला तसेच जेड एल०१ जाफरानी जर्दा तंबाखु असलेल्या मोठमोठया गोण्या व इतर कच्चा माल आढळुन आला. गुन्हे पथकाने गुन्हयासाठी वापरलेली गाडी देखील जप्त केल्याची माहिती पाटील यांनी दिली.


गुटखा वाहतूकीची माहिती मिळाली आणि सापळ्यात अडकले

बदलापूर पाईपलाईन रोडवरील खोणी फाटा येथे काहीजण चारचाकी वाहनाने गुटखा घेऊन येणार आहेत अशी माहिती गुप्त बातमीदारामार्फत कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलिस निरिक्षक संतोष उगलमुगले यांना मिळाली. त्यानुसार वरीष्ठ पोलिस निरिक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राहुल मस्के, सहाय्यक पोलिस निरिक्षक उगलमुगले , संदीप चव्हाण, पोलिस उपनिरिक्षक संजय माळी, पोलिस हवालदार प्रशांत वानखडे, दत्ताराम भोसले, सचिन वानखडे, मिथुन राठोड, गुरूनाथ जरग, गोरक्ष शेकडे, दिपक महाजन, अमोल बोरकर, बालाजी शिंदे, विश्वास माने, विजेंद्र नवसारे, अनुप कामत, विलास कडू आदिंनी सापळा लावून तिघांना अटक केली आणि गुटख्यासह तो बनविण्यासाठी थाटलेल्या कारखान्याचा पर्दाफाश केला.
 

Web Title: Gutkha making factory at Kuswali near Hajimalang Road; 17 lakhs worth seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.