पाण्यासाठी महिलांचे केडीएमसीच्या विरोधात हंडा कळशी उपोषण
By मुरलीधर भवार | Published: November 6, 2023 04:18 PM2023-11-06T16:18:16+5:302023-11-06T16:19:52+5:30
जोपर्यंत पाणी समस्या सूटत नाही. ताेपर्यंत हे बेमुदत उपोषण मागे घेतले जाणार नाही असा इशारा कपोते यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.
कल्याण - कल्याण शहरातील पश्चिम भागातील काही प्रभागात पाण्याची समस्या आहे. ही समस्या सोडविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करुन देखील त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सामाजिक कार्यकर्त्या कल्पना कपोते यांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधात आज पासून हंडा कळशी बेमुदत उपोषण सुरु केले आहे. या उपोषणात पाणी टंचाईपासून त्रस्त असलेल्या महिलाही सहभागी झालेल्या आहेत. जोपर्यंत पाणी समस्या सूटत नाही. ताेपर्यंत हे बेमुदत उपोषण मागे घेतले जाणार नाही असा इशारा कपोते यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.
शहराच्या पश्चिम भागीतल पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या या जुन्या आहेत. ४० वर्षे झाली तरी त्याची देखभाल दुरुस्ती केली गेलेली नाही. या जलवाहिनी काही ठिकाणी गटारातून गेलल्या आहेत. त्यामुळे नागरीकांनी गढूळ आणि दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. या भागाला होणारा पाणी पुरवठा अनियमित स्वरुपाचा आहे. तसेच पाण्याचा दाब कमी असतो. त्यामुळे नागरीकाना पुरेसे पाणी मिळत नाही. जे काही पाणी मिळते ते देखील दूषित आणि गढूळ असते. त्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरीकांना त्वचा रोग होत आहेत. महापालिका नागरीकांना स्वच्छ पाणी पुरवठा करु शकत नाही. ही महापालिका प्रशासनाकरीता लाजीरवाणी गोष्ट आहे. नागरीकांकडून मालमत्ता कर वसूल केला जातो. तसेच पाणी पुरवठा नियमित केला जात नसताना पाण्याची बिले नागरीकांच्या घरी पाठविली जातात. या विविध मुद्यांकडे कपाेते यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
कपोते या ज्याठिकाणी बेमुदत उपोषण करीत आहे. त्यांच्या शेजारीच खडकपाडा व्यापारी रहिवासी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक यांनी देखील एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरु केले आहे. वनश्री संकूल, भाेईर कन्स्ट्रक्शन, परिसर, भगवानननगर, जय आंबे, पंचमुखी, शेलार रेसीडेन्सी, आराधना सोसायटी, जय संतोषी माता, श्रीकृष्ण दर्शन या परिसरातील नागरीकांना अनियमित आणि दूषित पाणी पुरवठा केला जात आहे. ही समस्या सोडविण्यात यावी अन्यथा येत्या १३ तारखेपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा बोरगांवकर यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.