पाणी समस्येने त्रस्त नागरिकांचा केडीएमसीविरोधात हंडा कळशी मोर्चा
By मुरलीधर भवार | Published: October 19, 2023 04:26 PM2023-10-19T16:26:56+5:302023-10-19T16:27:10+5:30
टाटा नाका या परिसरात सुमारे ७ ते ८ हजार लोकसंख्या आहे.
कल्याण- शहराच्या पूर्व भागातीलकल्याण शीळ रोड वरील टाटा पावर परिसरात नागरिकाना कमी दाबाने पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे नागरीकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणी टंचाईच्या विरोधात संतप्त नागरीकांनी आज दुपारी कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर हंडा कळशी मोर्चा काढून महापालिका प्रशासनाच्या विरेधात घोषणाबाजी केली.
टाटा नाका या परिसरात सुमारे ७ ते ८ हजार लोकसंख्या आहे. कमी दाबाने व अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे या भागात पाणी समस्या निर्माण झाली आहे. पाणी टंचाई बाबत अनेकदा पालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या आंदोलने केली आहेत. मात्र आश्वसना पलीकडे काहीच कार्यवाही होत नाही .त्यामुळे आज संतापलेल्या नागरिकांनी महिलांसह सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने महापालिका मुख्यालयावर हंडा कळशी मोर्चा काढला .या मोर्चात हंडा कळशी घेऊन महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. आठ दिवसात समस्या सुटली नाहीतर उग्र आंदोलन करण्याचा इशारा मोर्चाचे नेतृत्व करणारे नरसिंग गायसमुद्रे यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.