प्रदूषणमुक्तीचे उद्दिष्ट साध्य करू तेव्हा वाढेल हॅप्पीनेस इंडेक्स : नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 07:23 AM2022-12-24T07:23:35+5:302022-12-24T07:24:34+5:30

देशातील जनतेची जल, वायू आणि ध्वनी प्रदूषणातून मुक्तता करणे याचाच अर्थ ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना राबविणे आहे - गडकरी

Happiness index will increase when we achieve the goal of pollution free Nitin Gadkari | प्रदूषणमुक्तीचे उद्दिष्ट साध्य करू तेव्हा वाढेल हॅप्पीनेस इंडेक्स : नितीन गडकरी

प्रदूषणमुक्तीचे उद्दिष्ट साध्य करू तेव्हा वाढेल हॅप्पीनेस इंडेक्स : नितीन गडकरी

Next

कल्याण : देशातील जनतेची जल, वायू आणि ध्वनी प्रदूषणातून मुक्तता करणे याचाच अर्थ ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना राबविणे आहे. ज्यावेळी आपण प्रदूषणमुक्तीचे उद्दिष्ट साध्य करू, त्यावेळी भारताचा हॅप्पीनेस इंडेक्स वाढेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते आणि महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

कल्याण जनता सहकारी बँकेला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अत्रे रंगमंदिरात आयोजित सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात गडकरी बोलत होते. यावेळी संघाचे कोकण प्रांत संघचालक डॉ. सतीश मोढ, बँकेचे अध्यक्ष सचिन आंबेकर, उपाध्यक्ष डॉ.  रत्नाकर फाटक, अतुल  खिरवडकर, मोहन आघारकर, प्रा. अशोक प्रधान, पोस्टमास्तर जनरल गणेश सावळेश्वरकर, भाजप आ. गणपत गायकवाड, कुमार आयलानी, माजी आ. नरेंद्र पवार, आदी उपस्थित होते.

गडकरी यांच्या हस्ते मधू हब्बू आणि अमित घैसास यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हब्बू यांनी त्यांना मिळालेली पुरस्काराची रक्कम वनवासी कल्याण आश्रमाला दिल्याचे जाहीर केले. गडकरी म्हणाले की, भौतिक सुखाबरोबर समाज सुखी, समाधानी, संपन्न करायचा असल्यास जनतेला प्रदूषणातून मुक्ती दिली पाहिजे. त्यासाठी  इलेक्ट्रिक, इथेनॉल, हायड्रोजनवर चालणारी वाहने वापरात आली पाहिजे. या खात्याचा मंत्री असल्याने मीच दंडा घेऊन बसलो आहे. मुंबईत नॉन एसी इलेक्ट्रिक बस ३९ रुपये भाडे आकारते. एसी ई- बस ४१ रुपये भाडे आकारते. डिझेलवर चालणारी बस ११५ रुपये भाडे आकारते. त्यामुळे ई-बस आल्या तर ३० टक्के भाडे कमी होईल. तसेच प्रवाशांना एसी बसमधून प्रवास करता येईल.

देशातील गरीब जनतेच्या पैशांतून पायाभूत सुविधा उभ्या करायच्या आणि त्यांचे पैसे त्यांना परत करायचे, असे धोरण आहे. दरवर्षी माझ्या खात्याला पायाभूत सोयीसुविधांसाठी तीन लाख कोटी हवे आहेत. जनतेकडून हा पैसा उभा करून जनतेला आठ टक्के परतावा दिला जातो.

अनेक परदेशी कंपन्या भारताबरोबर येण्यासाठी तयार आहेत. त्याचे कारण भारताकडे संस्कृती, इतिहास आणि चारित्र्य या गोष्टी आहेत. कल्याण जनता बँकेच्या सदस्यांनी भत्ता घेणार नाही, असे जाहीर केले. या बँकेचा उत्तरोत्तर विकास होत जाईल, असे गौरवोद्गार गडकरी यांनी काढले.

Web Title: Happiness index will increase when we achieve the goal of pollution free Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.