शिवसैनिकांवरील 'तो' राजकीय खटला मागे; २७ जणांनी मोर्चा काढून केलेली घोषणाबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 11:53 AM2022-03-14T11:53:53+5:302022-03-14T11:54:10+5:30
मनाई आदेशाचा भंग केल्याचा ठपका ठेवून मानपाडा पोलीस ठाण्यात सरकारतर्फे दाखल केलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला होता.
कल्याण : महाविकास आघाडी सरकारने राजकीय गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे २७ शिवसैनिकांविरोधातील कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात दाखल असलेला खटला रद्द करून मागे घेण्यात आला आहे. डोंबिवलीकर तथा शिवसेनेचे नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना यासंदर्भात पत्र दिले होते.
शिवसेनेशी फारकत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक साधल्याने २० जानेवारी २०१२ मध्ये कल्याण लोकसभेचे तत्कालीन खासदार आनंद परांजपे यांच्या एमआयडीसी येथील कार्यालयावर संतप्त २७ शिवसैनिकांनी मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी केली होती.
मनाई आदेशाचा भंग केल्याचा ठपका ठेवून मानपाडा पोलीस ठाण्यात सरकारतर्फे दाखल केलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे हे करीत होते. हा खटला दहा वर्षांपासून कल्याण न्यायालयात सुरू होता.