ताे जेलमधून सुटला आणि त्याने थेट परिक्षा केंद्र गाठले, मोक्कातील आरोपीला सात वर्षानंतर मिळाला जामीन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 09:49 PM2023-04-22T21:49:42+5:302023-04-22T21:50:22+5:30
२६ जुलै २०१६ मध्ये विठ्ठलवाडी पाेलिसांनी एका तरुणाला चाेरीच्या गुन्हयात संशयित आराेपी म्हणून ताब्यात घेतले. हा तरुण दुसरा तिसरा काेणी नसून किशाेर रुमाले हाेता.
कल्याण - त्याला माेक्का लागला. ताे तळाेजा जेलमध्ये हाेता. सात वर्षानंतर ताे जामिनावर सुटला. त्याने वकिलीची परिक्षा देण्यासाठी थेट नवी मुंबईतील भारती विद्यापीठातील परिक्षा केंद्र गाठले. त्याचे नाव किशाेर रुमाले असे आहे. रुमाले यांच्या जामिनाकरीता वकिल गणेश घाेलप हे प्रयत्नशील हाेते. त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याने हे शक्य झाले. त्याच्या कुटुंबियांनीही बरीच धावपळ केली.
२६ जुलै २०१६ मध्ये विठ्ठलवाडी पाेलिसांनी एका तरुणाला चाेरीच्या गुन्हयात संशयित आराेपी म्हणून ताब्यात घेतले. हा तरुण दुसरा तिसरा काेणी नसून किशाेर रुमाले हाेता. ताे त्याचे नशीब आजमाविण्याकरीता अंबरनाथला आला हाेता. रुमालेला अटक झाली. त्याला आधारवाडीला पाठविले गेले. आधारवाडी जेलमधून त्याचा ताबा आणखीन एक गुन्ह्यात अंबरनाथ पाेलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर तलासरी पालघर पाेलिसांनी त्याचा ताबा घेतला. विठ्ठलवाडी आणि अंबरनाथ पाेलिसांनी चुकीने व गैरसमजूतीने त्यास अटक केल्याचा अहवाल न्यायालयास सादर केला. त्याला साेडून देण्याचे पत्र आधारवाडी जेलला दिले. तलासरी पाेलिस स्टेशनकडून असलेल्या गुन्ह्यामुळे त्याला साेडण्यात आले नाही. त्याच्या गुन्हयातील कलमात वाढ करुन त्याच्या विराेधात दराेड्याचे कलम लावले गेले.
९० दिवसानंतर त्याची आेळख परेड करण्यात आली. गैर समजूतीने पाठविलेल्या आराेपी किशाेर हा दराेड्याच्या गुन्ह्यातील मुख्य आराेपीच नव्हे तर सराईत गुन्हेगारांच्या टाेळीचा अॅक्टीव्ह मेंबर असल्याचा आराेप असल्याने त्याला माेक्का लागला. ३ वर्षे काही हाेणार नाही. याची प्रचिती किशाेरला आल्याने त्याच अवसान गळाले. मात्र त्याला वाचनाची आवड हाेती. त्याला वकिल घाेलप यांनी हेरले. त्यांनी त्याला उभारी दिली. किशाेरला वकिल बनायचे हे घाेलप यांच्या लक्षात आले. किशाेरला माेक्का न्यायालयाने एल.एल.बी करण्यास परवानगी दिली. १३ वेळा युक्तीवाद न झालेल्या रुमाले याचा जामीन अर्ज सुनावणीस आला.
अवघ्या काही दिवसातच आदेश पारित झाला. त्याच्या जामीन अर्जावर १९ एप्रिल राेजी आॅर्डर झाली. परिक्षा २१ एप्रिल राेजी हाेती. त्या आधीच २० एप्रि राेजी जेलपत्रावर सही हाेण्याकरीता सायंकाळी पाच वाजले. किशाेर हा मूळचा मुरबाड येथील एका गावात राहणारा असल्याने त्याचे वडिल, भाऊ, मित्र गाडी करुन आले हाेते. एक वाजता पेपर हाेता. तळाेजा जेलमधून बाहेर पडलेला किशाेर हा खारघरमध्येच भारती विद्यापीठाचे परिक्षा केंद्र असल्याने १२.४५ मिनिटांला परिक्षा केंद्रावर पाेहचला. त्याने परिक्षा दिली. माेक्का आराेपी अशी त्याची छबी असली तरी किशाेरची वकिल हाेण्याची इच्छा पूर्ण हाेणार की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.