रोज दहा जणांकडे जाऊन चहा प्यायचाच! बावनकुळे यांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 11:25 AM2023-10-30T11:25:26+5:302023-10-30T11:25:45+5:30
डोंबिवलीत मंगल कलश यात्रा आणि लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेताना केले मार्गदर्शन
लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: मे २०२४ मध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लोकसभा निवडणुकीत भाजपला महाविजय मिळवून देण्यासाठी पक्षाने तुमची वॉरियर्स, कमांडर म्हणून तुमची नियुक्ती केली आहे. भाजपच्या वॉरियर्सनी रोज १० जणांकडे जाऊन चहा प्यायचाच, असा कानमंत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे कार्यकर्त्यांना दिला. बावनकुळे रविवारी डोंबिवलीत मंगल कलश यात्रा आणि लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आले होते.
जो पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘मन की बात’ ऐकणार नाही, पक्षाचे सरल ॲप डाऊनलोड करून रोज अपडेट राहात नाही त्या सगळ्यांची नोंद पक्ष घेत असून पक्षाने ठरविले तर अशा वॉरियर्सना पालिका असो किंवा अन्य निवडणुकांमध्ये पक्षाचा एबी फॉर्म मिळणार नाही, अशी स्पष्ट शब्दांत तंबीच त्यांनी बंद दरवाजाआड झालेल्या बैठकीत दिली.
१५० जणांचा ग्रुप करा
प्रत्येक वॉरियर्सने त्यांच्या तीन बुथवर जाऊन प्रत्येक बुथवर सुमारे १५० जणांचा ग्रुप तयार करायचा आहे, त्यामधून ६ व्हाॅट्सॲप ग्रुप तयार करायचे आणि त्याद्वारे ९०० नागरिकांना जोडायचे, असेही त्यांनी सूचित केले.
मन की बात बुथवर १५० जणांना सोबत घेऊन एकत्र येऊनच ऐकायची, त्यासाठी सुमारे दोन हजार रुपये चहासाठी खर्च करावा.
खर्च करणे जमणार नसेल तर पक्षाला कळवावे जेणेकरून
व्यवस्था करण्यात येईल, असा
टोला लगावताच सभागृहात हशा पिकला.
पुढील १५ वर्षे भाजपचाच मुख्यमंत्री
पुढील १५ वर्षे राज्यात भाजपचाच मुख्यमंत्री राहील यासाठी सगळ्यांनी भरपूर काम करावे. पक्षाला आणखी चांगले दिवस येणार असून त्यात तुम्ही २०२४ च्या महाविजयसाठी जोरदार काम करावे. तुमचेही चांगले दिवस येतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.