दारू पित असताना खुर्चीला लागला धक्का थेट गोळीच झाडली; एकजण जखमी
By प्रशांत माने | Updated: January 10, 2024 16:45 IST2024-01-10T16:45:35+5:302024-01-10T16:45:59+5:30
याप्रकरणी अजय सिंग आणि त्याच्या चार साथीदारांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे.

दारू पित असताना खुर्चीला लागला धक्का थेट गोळीच झाडली; एकजण जखमी
डोंबिवली: बारमध्ये दारू पित असताना खूर्चीला धक्का लागल्याने दोन गटात झालेला वाद विकोपाला गेला. यात एकाने पिस्तुल काढून दुस-या गटातील एका तरूणावर थेट गोळी झाडल्याचा धक्कादायक प्रकार पुर्वेकडील मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सेवन स्टार या बारमध्ये मंगळवारी रात्री सव्वाएकच्या सुमारास घडला. विकास भंडारी असे गोळीबारात जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. त्याच्या खांदयाला गोळी लागली असून त्याच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अजय सिंग आणि त्याच्या चार साथीदारांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे.
या बारमध्ये अजय सिंग हा मित्रांसोबत दारू पीत होता. त्याच्याच बाजूच्या टेबलवर विकास भंडारी हा देखील आपल्या मित्रांसोबत दारू पीत होता. यावेळी खूर्चीला धक्का लागला म्हणून अजय आणि विकास यांच्यामध्ये वाद झाला. हा वाद वाढत गेला आणि अजय ने संतापाच्या भरात आपल्या जवळील पिस्तुलाने विकासच्या दिशेने गोळी झाडली. यात विकासच्या खांदयाला गोळी लागून तो जखमी झाला. त्याला तातडीने नजीकच्या खाजगी रूग्णालयात दाखल केले गेले. दरम्यान या गोळीबार घटनेची माहीती मिळताच मानपाडा पोलिस घटनास्थळी हजर झाले. पोलिसांच्या पथकाने बारमधून पसार झालेला मुख्य आरोपी अजय सिंग याच्यासह अन्य चौघांना पाठलाग करून पकडले.