मुसळधार पावसाने 400 पेक्षा जास्त घरात शिरले पाणी; रहिवाशांची रात्र दुसऱ्याच्या घरात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 05:06 PM2022-07-05T17:06:18+5:302022-07-05T17:07:25+5:30
यंदाच्या पावसात गेल्या महिन्याभरात शहाड येथील आंबिकानगरचा नाला वारंवार तुंबल्याने सगळे पाणी रस्त्यावर येऊन वाहतूक कोंडी होत होती.
ठाणे/कल्याण - कल्याण पूर्व भागातील आडीवली ढोकळी परिसरास मूसळधार पावसाचा फटका बसला आहे. या भागातील ऑगस्टीनगरातील जवळपास 400 पेक्षा जास्त नागरीकांच्या घरांमध्ये काल रात्री पावसाचे पाणी शिरल्याने नागरीकांना रात्र दुसऱ्यांच्या घरी अथवा घरातील खाटेवर काढावी लागली. पावसाचे पाणी घरात शिरल्याने त्यांच्या घरातील जीवनाश्यक आणि गृहोपयोगी वस्तुंचे नुकसान झाले आहे.
आडीवली ढोकळी हा परिसर 27 गावांमध्ये समाविष्ट होता. 27 गावांपैकी 18 गावे महापालिकेतून वगळण्यात आल्याने आडीवली ढोकळी परिसर महापालिकेतून वगळण्यात आला. या परिसराचे माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी या भागासाठी निधीची मागणी केली होती. आडीवली ढोकळी परिसरात ज्या नाल्यामुळे पाणी तुंबते, ते नागरिकांच्या घरात शिरते. या परिसरातील एक मोठा नाला अरुंद आहे. त्याचे रुंदीकरण करण्यात यावे यासाठी महापालिकेकडून निधीची मागणी पाटील यांनी केली होती. महापालिकेत स्थायी समिती सभापतीपदी संदीप गायकर सभापती असताना पाटील यांच्या मागणीनुसार महापालिकेने 1 कोटी 75 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, हा निधी वापरला गेला नाही. त्यामुळे नाल्यांचे रुंदीकरण रखडले आहे. या भागात एका बांधकाम व्यावसायिकाने संरक्षक भिंतही बांधली आहे. त्यामुळे नैसर्गिक प्रवाह खुंटला आहे. ही संरक्षक भिंत नागरीकांच्या पुढाकाराने तोडण्यात आली होती. मात्र, पावसाला संपल्यावर पुन्हा त्याठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यात आली. अतिवृष्टी आणि जोरदार मूसळधार पाऊस झाला की नाल्यामुळे या भागात चाळीतील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरते. याप्रकरणी गेल्या पाच वर्षापासून पाटील यांचा पाठपुरावा सुरु आहे. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना दरवर्षी पावसाच्या पाण्याचा फटका सहन करावा लागतो.
दरम्यान, यंदाच्या पावसात गेल्या महिन्याभरात शहाड येथील आंबिकानगरचा नाला वारंवार तुंबल्याने सगळे पाणी रस्त्यावर येऊन वाहतूक कोंडी होत होती. हा नाला अंडरपास असल्याने त्यात जवळपास 100 फूटापर्यंत कचरा तुंबला होता. हा नाला महापालिकेने वरुन पंक्चर केल्याने आत्ता कुठे त्याठिकाणी थोडाफार दिलासा मिळाला आहे. त्याच धर्तीवर आडीवली ढोकळी परिसरातील नाल्यामुळे तुंबणाऱ्या पाण्याच्या समस्येकडे महापालिकेने लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्रस्त नागरिकांकडून केली जात आहे.