वरप, कांबा आणि म्हारळ भागातील 2 हजार पूरग्रस्तांना मदतीचा हात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 04:59 PM2021-07-27T16:59:39+5:302021-07-27T17:00:16+5:30
kalyan : वरप, कांबा आणि म्हारळ या भागातील 2 हजार नागरिकांना काल सायंकाळी कृष्णा रेसिडेन्सीच्या आवारात जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
कल्याण : गेल्या आठवडय़ात झालेल्या जोरदार अतिवृष्टीचा फटका उल्हासनदी लगत असलेल्या कल्याण ग्रामीण भागातील म्हारळ, वरप आणि कांबा परिसरातील नागरीकांना बसला. त्यांच्या घरात पाणी शिरुन त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. ही बाब लक्षात घेता कल्याणचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते मदतीचा हात देण्यात आला आहे.
वरप, कांबा आणि म्हारळ या भागातील 2 हजार नागरीकांना काल सायंकाळी कृष्णा रेसिडेन्सीच्या आवारात जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. चटई, अंथरुण, बेडशीट, टॉवेल, ब्लँकेट, अन्नधान्यांचे कीट देण्यात आले. जवळपास 2 ट्रकभरुन ही मदत वाटप करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, उल्हासनगर शहर प्रमुख राजेंद्र चौधरी आणि कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे उपस्थित होते.
अतिवृष्टीचा फटका जसा कोकणाला बसला आहे. त्याच प्रमाणो कल्याण लोकसभा मतदार संघातील नागरीकांनाही बसला आहे. सखल भागातील नागरीकांच्या घरात पाणी शिरले होते. त्यांना मदतीचा हात शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे. संकट कोणतेही असो मदतीसाठी सदैव शिवसेना पुढे असते हे खासदारांनी अधोरेखित करीत मदत केली आहे.
पूरग्रस्त नागरीकांच्या नुकसान भरपाईचे पंचनामे तहसील कार्यालयाकडून सुरु करण्यात आले आहे. सरकारकडूनही पूरग्रस्ताना मदत दिली जावी यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले.